Sridevi Wax Statue (Photo Credits: Instagram/Pinkvilla)

सिंगापूर (Singapore) येथील मादाम तुसाँ (Madame Tussauds) मध्ये उभारण्यात आलेला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi)  यांचा मेणाचा पुतळा आजपासून संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना पाहता येणार आहे. यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी श्रीदेवी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मादाम तुसाँ संग्रहालयातर्फे या प्रतिकृतीचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. तर श्रीदेवी यांचे पती व सिनेनिर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी 2 सप्टेंबर रोजी या पुतळ्याची एक झलक सादर करणारा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रीदेवी यांचा पुतळा संपूर्ण दिसत नसला तरी गोल्डन रंगाचा ड्रेस डोक्यावर हटके मुकुट, हेअरस्टाईल आणि मेकअप पाहता ही मिस्टर इंडिया (Mr. India) चित्रपटातील हवाहवाई लूकची प्रतिकृती असल्याचे चटकन लक्षात येते.

हा व्हिडीओ शेअर करताना बोनी कपूर यांनी त्यासोबत एक खास भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. ‘श्रीदेवी फक्त माझ्याच नाही तर कोट्यावधी चाहत्यांच्या मनात आजही जिवंत आहे. मी मादाम तुसाँ संग्रहालयातील तिचा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी आतुर आहे’ अशा आशयाचे हे ट्विट आहे.

बोनी कपूर ट्विट

मादाम तुसाँ या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. या सर्व सेलिब्रिटीजसोबत आता बॉलिवूची हवाहवाई श्रीदेवी यांचा देखील मेणाचा पुतळा पाहायला मिळणार आहे. (सिंगापूरच्या Madame Tussauds म्युझियममध्ये अनुष्का शर्मा सोबत प्रत्येक चाहत्याला सेल्फी क्लिक करायची संधी)

श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी निधन झाले होते. एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या या बबली गर्लने चिरकाल लक्षात राहतील अशा अनेक भूमिका साकारल्या होत्या. अभिनय, सौंदर्य, नटखट अदा आणि अफलातून नृत्य याच्या जोरावर श्रीदेवीने लाखो फॅन्स कमावले होते. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला मॉम हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.