Sonu Sood ची मोठी घोषणा; देशात 15 ते 18 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स स्थापन करणार (Watch Video)
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

सोनू सूद (Sonu Sood) एकेकाळी फक्त बॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जायचा, मात्र आता त्याची ओळख ‘गरीबांचा देवदूत’ अशी केली जात आहे. मागील वर्षी, कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला त्याने मोठा आधार दिला होता. आताच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही तो जनतेला मदत करीत आहे. सामान्य लोक सोनू सूदला देव मानू लागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशाने ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेची समस्या पाहिली. यामुळे अनेकांचे प्राणही गेले. आता अशा घटना टाळण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावर घोषणा केली आहे की, तो देशभरात सुमारे 15 ते 18 ऑक्सिजन प्लांट्स स्थापन करणार आहे.

सोनू सूद मागच्या वर्षी अडचणीत असलेल्या मजुरांना आणि गरजूंना घरी जाण्यासाठी मदत केल्याने चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने मदतीचा ओघ तसाच सुरु ठेवला. यंदाही त्याने रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्यापासून ते ऑक्सिजन मिळवून देण्यापर्यंत मदत केली आहे. आता तो स्वतः देशातील 15-18 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स उपभारणार आहे. येत्या 2-3 महिन्यात हे काम होईल असे त्याने एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे. (हेही वाचा: Kangana Ranaut ची कबुली- 'आपल्याकडे काम नाही, मागच्यावर्षी फक्त अर्धाच कर भरला, सरकार थकित करावर जोडत आहे व्याज')

याची सुरुवात आंध्र प्रदेशच्या कर्णूल आणि नेल्लोर येथून होईल. त्यानंतर तेलंगाना, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यात ऑक्सिजन संयंत्र स्थापित केले जाणार आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून आला होता. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात अपयशी ठरल्याने सरकारने जनतेचा रोषही ओढवून घेतला होता.

आता अशी परिस्थिती देशात पुन्हा उद्भवू नये म्हणून सोनू सूद पुढे आला आहे. देशातील विविध भागात तो ऑक्सिजन प्लांट्स उभारणार असून, त्याद्वारे रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. या महिन्यात या कामाला सुरुवात होईल.