शाहरुख खान बनला 2020 Hyundai Creta चा पहिला भारतीय मालक, जाणून घ्या या लक्झरी कारची वैशिष्ट्ये
शाहरुख खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. शाहरुख खानला त्याच्या वेगळ्या स्टाईलमुळे जगभरातील चाहत्यांची पसंती मिळताना दिसून येते. शाहरुख खानकडे आलिशान बंगल्याव्यतिरिक्त अनेक लक्झरी कार्सही आहेत. शाहरुखच्या वाहनांच्या यादीमध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. दक्षिण कोरियाची कार बनवणारी कंपनी, ह्युंदाईने आपली कार क्रेटाचे (2020 Hyundai Creta) एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. कंपनीने भारतात क्रेटा या मॉडेलची विक्री सुरू केली असून, या गाडीचा भारतातील पहिला मालक बनण्याचा मान शाहरुख खानला मिळाला आहे.

शाहरुख खान कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे आणि. कंपनीने आपली भारतातील पहिली कार शाहरुख खानला दिली आहे. ऑटो एक्सपो 2020 मध्ये शाहरुख खानने या कारचे अनावरण केले होते. त्यानंतर एका छोटेखाणी कार्यक्रमात शाहरुखला ही गाडी देण्यात आली. क्रेटाला भारतात खूप पसंत केले गेले आहे. परंतु अलीकडे सेल्टोस आणि टाटा नेक्सन सारखी वाहने बाजारात आल्यानंतर क्रेटासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

कारमध्ये बाहेरील बाजूस थ्री पार्ट एलईडी लाईट्स आणि स्क्वेअर व्हील आर्क आहे. अद्ययावत केलेल्या क्रेटामध्ये नवीन ग्रील, नवीन सेट अ‍ॅलोय व्हील्स आणि ब्रँड न्यू केबिन आहे. कारमध्ये ड्युअल टोन केबिन आहे जी खूपच सुंदर आहे. ह्युंदाईने क्रेटामध्ये 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह प्रगत ब्लू लिंक कनेक्टिव्हिटी सिस्टम, 7.0-इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल डिस्प्लेसह, 8 स्पीकर्ससह बोस साऊंड सिस्टम , टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि फ्लॅट बॉटम स्टीयरिंग यांसारखी अनेक उत्तम वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. (हेही वाचा: चीनने बनवली सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेंज देणारी इलेक्ट्रिक कार; P7 ला एकदा चार्ज केल्यावर धावणार 700 km, Tesla Model 3 ला देणार टक्कर)

इंजिनबद्दल बोलायचे तर यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन आहे. हे दोघेही 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि ऑटोमेटिक ट्रांसमिशनमध्ये येतात. याशिवाय यामध्ये 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह, 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) देण्यात आले आहे. इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट्स अशा तीन ड्रायव्हिंग मोडमध्ये कार आली आहे. 2020 ह्युंदाई क्रेटाची किंमत 9.9 लाख ते 17.20 लाख रुपयांपर्यंत आहे.