चीनने बनवली सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेंज देणारी इलेक्ट्रिक कार; P7 ला एकदा चार्ज केल्यावर धावणार 700 km, Tesla Model 3 ला देणार टक्कर
Xpeng P7 (संग्रहित संपादित प्रतिमा)

चीनची (China) ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Xpeng ही इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Cars) सर्वाधिक ड्रायव्हिंग रेंजसाठी ओळखली जाते. अलीकडेच कंपनीने अशा ऑर्डरमधील आपली नवीन गाडी, P7 सादर केली आहे. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी एकदा चार्ज केल्यावर तब्बल 700 किमीपेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज प्रदान करणार आहे. इतकी जास्त ड्रायव्हिंग रेंज देणारी ही चीनची पहिली गाडी आहे, याची पुष्टी चीनच्या उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MIIT) केली आहे.

Xpeng  ही 5 वर्षांची स्टार्टअप कंपनी आहे, ज्यांचे P7 हे फ्लॅगशिप मॉडेल आहे. कंपनीने गेल्या वर्षी ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणली होती. अहवालानुसार या कारमध्ये चीनमधील प्रसिद्ध टेस्ला मॉडेल 3 ला आव्हान देण्याची क्षमता आहे. Xpeng 5  P7 एक इलेक्ट्रिक सेडान आहे, जी रियर-व्हील-ड्राईव्ह व्हर्जनमध्ये येते. या गाडीमध्ये 80.87kWh च्या बॅटरी पॅकचा वापर केला गेला आहे,  जी 263 एचपी पॉवर आणि 390Nm पीक टॉर्क प्रदान करते. हा बॅटरी पॅक 12.5 किलोवॅट/100 किमी पर्यंत पॉवर देते.

अहवालानुसार, या इलेक्ट्रिक कारचे टेस्टिंग अवघड अशा बर्फाळ रस्त्यावर केले जात आहे. या कारची तुलना टेस्ला मॉडेल 3 शी केली असता, त्याची रेंज EPA cycle नुसार फक्त 322 मैलांची आहे. दरम्यान, 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये, चीनची वाहन निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटरने भारतात प्रवेश करण्याचे संकेत देत, Ora R1 इलेक्ट्रिक कारसह इतर गाड्याही सादर केल्या. ही भारतात लाँच केली जाऊ शकणारी सर्वात स्वस्त कार ठरू शकते. (हेही वाचा: भारतात लाँच झाली देशातील पहिली 10 Gear एसयूव्ही; जाणून घ्या किंमत व खास वैशिष्ट्ये)

चीनमध्ये Ora R1 ची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. इलेक्ट्रिक वाहनांना चीन सरकारकडून मिळणारे अनुदान हे यामागील कारण आहे. Xpeng ने सांगितले की लवकरच कंपनी P7 ला अधिकृतपणे लॉन्च करणार आहे आणि 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत या गाडीचे चीनमध्ये वितरण सुरू होईल.