सलमान खानने 'दबंग 3' च्या सेटवर मोबाईल वापरावर घातली बंदी; या कारणासाठी हा 'दबंग' निर्णय
Salman Khan Dabangg 3 (Photo Credits: Instagram)

अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या 'दबंग 3' (Dabangg 3) च्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. हा आधी प्रदर्शित झालेल्या दबंग आणि दबंग 2 चित्रपटाचा प्रिक्वेल असेल. म्हणजेच दबंग 3 मध्ये सलमान खान तरुण आणि म्हातारा अशा दोन्ही लूकमध्ये दिसणार आहे. याआधी या चित्रपटातील सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) चा लूक प्रदर्शित झाला आहे. मात्र तरीही सलमानने दबंग 3 च्या सेटवर मोबाईल फोन आणण्यावर बंदी घातली आहे. त्याचा हा निर्णय चित्रपटाच्या इतर टीममेंबरसाठी बुचकळ्यात पाडणारा होता.

हा निर्णय सलमान का घेतला असेल असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, शूटिंगदरम्यान मोबाईल फोन वापरावर सलमानने बंदी घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण करणारी महेश मांजरेकरची (Mahesh Manjrekar) मुलगी सई (Saiee). सई या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार असून तिचा लूक बाहेर लीक होऊ नये, म्हणून सलमानने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- Dabangg 3 Release Date: 20 डिसेंबरला सलमान खान घेऊन येणार 'दबंग3'

या चित्रपटात सई सलमान खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची भूमिका आधीच्या कथेमध्ये जास्त असेल. इतकच नव्हे तर चुलबुल पांडेच्या सध्याच्या कथेमध्येही त्यांचेही काहीतरी नाते दाखविण्यात आले आहे.

दबंग 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा (Prabhu Deva) करत आहे आणि अरबाज खान (Arbaaz Khan) या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर ला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. याआधी 'दबंग' (Dabangg) चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) याने तर 'दबंग 2' (Dabangg 2) या चित्रपटाचे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते.