'Radhe अजिबात चांगला चित्रपट नाही'; सलमान खानचे वडील Salim Khan यांनी दिली प्रामाणिक प्रतिक्रिया
Salman Khan and Salim Khan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट ‘राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पूर्णतः नाकारले आहे. अगदी चाहत्यांपासून समिक्षकांपर्यंत सर्वांनीच याबाबत अतिशय वाईट रिव्ह्यूज दिले आहेत. त्यामध्ये आता खुद्द सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांची भर पडली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी ‘राधे’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. सलीम खान यांनी म्हटले आहे की, राधे अजिबात चांगला चित्रपट नाही. याशिवाय सलीम खान यांनी दबंगला वेगळा चित्रपट आणि बजरंगी भाईजान एक चांगला चित्रपट असल्याचे म्हटले आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान खानच्या ‘राधे’बाबत सांगितले की, ‘हा चित्रपट दबंग 3 पेक्षा खूप वेगळा आहे. बजरंगी भाईजान चांगला चित्रपट आहे. राधे हा अजिबात चांगला चित्रपट नाही, परंतु प्रत्येकाला पैसे मिळावे याची जबाबदारी व्यावसायिक सिनेमावर असते. प्रत्येक कलाकाराला पैशांची गरज असते, कलाकारांपासून निर्माता, वितरक, भागधारकांना पैसा हवा असतो. अशाप्रकारे ही सायकल चालते व सिनेमाचा व्यवसाय चालतो. प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. त्याच प्रकारे सलमान खानने परफॉर्म केले. या चित्रपटाच्या भागधारकांना फायदा झाला आहे. अन्यथा राधे हा चांगला चित्रपट नाही.

सलीम खान पुढे म्हणाले, 'सध्या चित्रपटसृष्टीतली सर्वात मोठी समस्या म्हणजे इथे चांगले लेखक नाहीत. यामागचे कारण असे आहे की, लेखक हिंदी व उर्दू साहित्य वाचत नाहीत. ते बाहेरून काहीतरी पाहतात आणि त्यावरच विश्वास ठेवतात. ‘जंजीर’ हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी गेम चेंजर ठरला होता, मात्र त्यानंतर सलीम-जावेद यांच्यासारखी जोडी इंडस्ट्रीला मिळाली नाही. (हेही वाचा: करण जौहर नंतर आता शाहरुख सोबत कार्तिक आर्यन तुटली मैत्री, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण)

दरम्यान, राधे काही दिवसांपूर्वी ईदच्या दिवशी रिलीज झाला होता. चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 1.7 रेटिंग मिळाले आहे. सलमानचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याला इतके कमी रेटिंग मिळाले आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ सारखे कलाकार आहेत.