वाढदिवसानिमित्त शाहरुख खानची प्रतिमा झळकली Burj Khalifa वर; अशा प्रकारे सन्मान मिळवणारी जगातील पहिली व्यक्ती (Video)
बुर्ज खलिफावर साजरा झाला शाहरुख खानचा वाढदिवस (Photo Credit : Twitter)

बॉलिवूडचा बादशाह, डॉन, किंग खान शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आज 54 वा वाढदिवस आहे. आजवर शेकडो सिनेमांमधून त्याने आपला कोट्यवधींचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आजही सकाळपासून त्याच्या चाहत्यांनी मन्नतवर गर्दी केली होती. आपल्या आवडत्या ताऱ्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते ताटकळत उभे होते. मात्र आजच्या दिवसाचे औचित्य साधून थेट दुबईमध्येही (Dubai) एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने शाहरुखचा वाढदिवस साजरा झाला. ही गोष्ट ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तर वाढदिवसानिमित्त शाहरुख खानच्या  नावाची अक्षरे जगातील सर्वात उंच इमारतीवर, बुर्ज खलिफा (Burj Khalifa) वर झळकली आहेत.

शाहरुख खान हा जगातील पहिला अभिनेता किंवा व्यक्ती ठरला आहे, ज्याच्या नावांची अक्षरे बुर्ज खलिफावर दाखवण्यात आली. दुबईमधील शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी ट्रीट होती. ‘Happy Birthday To The King Of Bollywood Shah Rukh Khan’ अशी अक्षरे बुर्ज खलिफावर झळकली आहेत. अशाप्रकारे शाहरुखचा यावर्षी वाढदिवस एका वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे. याआधी फक्त महत्वाच्या घटनांच्याच प्रतिमा बुर्ज खलिफा वर झळकत असत.

(हेही वाचा: शाहरुख खान ला का म्हणतात बॉलिवूडचा बादशाह; 'डर' पासून 'चक दे इंडिया' पर्यंतचे 'हे' 10 चित्रपट देतील तुमच्या प्रश्नाचे उत्तर (See Photos)

दरम्यान, शाहरुखने काल रात्री उशिरा घराबाहेर जमलेल्या आपल्या चाहत्यांना भेटून, त्यांना अभिवादन करून आपला दिवस सुरू केला. आज संध्याकाळी त्याने मुलगा अब्राहम खानसोबत दुसऱ्यांदा आपले दर्शन चाहत्यांना दिले. आज दिवसभर मन्नतसमोर चाहत्यांची एकच गर्दी होती. आज शाहरुखने चाहत्यांनी भरलेल्या सभागृहात एका खास कार्यक्रमात हजेरी लावली, तिथे त्याने वाढदिवसाचा केक कापला व नृत्य केले. यावेळी त्याने चाहत्यांशी संवाद साधत आपल्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली.