National Icon: अभिनेते Pankaj Tripathi ठरले 'नॅशनल आयकॉन'; भारतीय निवडणूक आयोगाची घोषणा
Pankaj Tripathi (संग्रहित संपादित प्रतिमा)

पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तरुणांमधील अभिनेत्याची प्रसिद्धी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांची नॅशनल आयकॉन (National Icon) म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी 3 ऑक्टोबर रोजी व्होटर जंक्शन कार्यक्रमानिमित्त ही घोषणा केली. या घोषणेनंतर पंकज त्रिपाठी यांनी याबाबत आनंद व्यक्त करत निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.

लोकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला राष्ट्रीय आयकॉन बनवले जाते. पंकज त्रिपाठी हे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत, त्यामुळे ते लोकांना मतदानाच्या हक्काबाबत जागरूक करतील, असा विश्वास निवडणूक आयोगाला आहे. अभिनेत्याला यापूर्वी निवडणूक आयोगाने बिहारचा आयकॉन बनवले होते.

नॅशनल आयकॉन बनल्यानंतर पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले- 'धन्यवाद, निवडणूक आयोगाने सोपवलेली ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आपल्यासाठी ही एक चांगली संधी आहे.’ ही बातमी आल्यापासून पंकजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या खास शैलीत अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.

यापूर्वी 2014 मध्ये क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन बनवले होते. मात्र, चेतेश्वर स्वत: यापूर्वी कधीही मतदानासाठी गेला नव्हता. याशिवाय महेंद्रसिंग धोनीला नॅशनल आयकॉन बनवले आहे, पण तोही लोकसभा निवडणुकीत कधीही मतदान करू शकला नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाने सोमवारी 6 राज्यांतील सात विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. (हेही वाचा: सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवल्यास होऊ शकते कारवाई; केंद्राचा OTT आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मला सल्ला)

या 7 विधानसभा जागांवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या पोटनिवडणुका बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, महाराष्ट्रातील पूर्व अंधेरी, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, ओडिशातील धामनगर आणि उत्तर प्रदेशातील गोला गोरखनाथ येथे होणार आहेत. या निवडणुकांची अधिसूचना 7 ऑक्टोबरला जारी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.