अभिनेता- दिग्दर्शक प्रविण तरडेचा 'मुळशी पॅटर्न'(Mulshi Pattern) मराठीमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या मागील काही महिन्यांपासून चर्चेमध्ये होत्या. कोरोना व्हायरसचं संकट, लॉकडाऊन यांच्याशी जुळवून घेत आता पुन्हा चित्रीकरणाला सुरूवात होत असताना 'मुळशी पॅटर्न' चा हिंदी रिमेक 'गन्स ऑफ नॉर्थ' (Guns of North) साठी देखील काम सुरू झाल्याची चर्चा आहे. मिरर वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक 'गन्स ऑफ नॉर्थ' चं दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) करणार आहे. दरम्यान या सिनेमाची निर्मिती सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून (Salman Khan Production House) होणार आहे. तर सलमान खान आणि त्याच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा (Aayush Sharma) या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आयुष शर्मा याचं बॉलिवूडमध्ये लवयात्री या सिनेमातून पदार्पण झालं होतं. त्यामुळे लवयात्रीचा दिग्दर्शक अभिराज मिंदावाला हा 'गन्स ऑफ नॉर्थ' चं देखील दिग्दर्शन सांभाळेल अशी चर्चा होती मात्र आता सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये महेश मांजरेकर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान सलमान खान हा महेश मांजरेकर यांना त्याचा लकी चार्म समजतो. दबंग असो किंवा सलमानचे अन्य काही सिनेमे एखादा लहानसा रोलच्या माध्यमातून सलमान - महेश ही जोडी एकत्र काम करत असतेच.
महेश मांजरेकर यांनी मुळशी पॅटर्नमध्ये 'गणपत' ची भूमिका बजावली आहे. आणि आता ते या सिनेमाच्या रिमेकमध्ये दिग्दर्शकाच्या खूर्चीत बसलेले दिसतील. दरम्यान 'गन्स ऑफ नॉर्थ' ची स्क्रिप्ट पूर्ण झाली असून नोव्हेंबर 2020 मध्ये शुटिंगला सुरूवात होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात येत आहे. महेश मांजरेकर आयुष शर्माला येत्या काही दिवसांत या सिनेमासाठी अॅक्टिंग वर्कशॉर्पच्या माध्यमातून ट्रेन देखील करणार आहेत.
महेश मांजरेकरांचा 'भाई व्यक्ती आणि वल्ली' हा सिनेमा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा होता. आता 'गन्स ऑफ नॉर्थ' हा सिनेमा हिंदी सोबतच तेलगू, तमिळ, कन्नड, ओरिया या प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान आयुष शर्माने या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. तो अंदाजे 12 किलो वजन वाढवण्याची शक्यता आहे.