Michelle Trachtenberg (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Michelle Trachtenberg Passes Away: हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून खूप वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल क्रिस्टीन ट्रॅचटेनबर्ग (Michelle Trachtenberg) यांचे निधन झाले आहे. अवघ्या 39 व्या वर्षी अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. मिशेल आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, मिशेल ट्रॅचटेनबर्गचा मृतदेह न्यू यॉर्कमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आढळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

गॉसिप गर्ल मिशेल ट्रॅचटेनबर्ग चे निधन -

बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी मिशेल ट्रॅचटेनबर्ग ही चित्रपट आणि टीव्ही जगतातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांच्या मृत्यूची बातमी 26 फेब्रुवारी रोजी आली. मिशेल न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्क साउथ येथील वन कोलंबस प्लेस येथील तिच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिचा मृतदेह याच अपार्टमेंटमध्ये सापडला. (हेही वाचा -Justin and Hailey Bieber Divorce: प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायक जस्टिन बीबरचा होऊ शकतो घटस्फोट; पत्नी हेली बीबरला तब्बल 300 मिलियन डॉलर्सची पोटगी मिळण्याची शक्यता- Reports)

हॉलिवूड चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा -

मिशेल ट्रॅचटेनबर्ग यांच्या अचानक निधनाने हॉलिवूड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीनंतर तिच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर, तिचा मृत्यू कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत झाला नसल्याचे कळले आहे. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या काही काळापासून, मिशेल ट्रॅचटेनबर्ग तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये खूपच बदललेली दिसत होती, ज्यामुळे चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. अभिनेत्रीवर यकृत प्रत्यारोपण झाल्याच्या बातमी देखील काही माध्यमांनी प्रकाशित केल्या होत्या. सोशल मीडियावर मिशेल ट्रॅचटेनबर्ग यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. मिशेलने बालपणात एका टीव्ही जाहिरातीद्वारे अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक टीव्ही तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या.