Kumar Ramsay Passes Away: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा; हॉरर फिल्ममेकर रामसे बंधूंपैकी कुमार रामसे यांचे निधन
रामसे बंधू (Image Credit: Twitter)

चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे काल निधन झाले. या धक्क्यामधून अजूनही लोक सावरू शकले नाहीत, त्यात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉरर चित्रपटांसाठी (Horror Films) प्रसिद्ध असणाऱ्या कुमार रामसे (Kumar Ramsay) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी रामसे ब्रदर्समधील मोठे कुमार रामसे यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तसंस्था पीटीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार कुमार रामसे यांच्या मुंबईच्या हिरानंदानी येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शीला आणि त्यांची तीन मुले- राज रामसे, गोपाळ रामसे आणि सुनील रामसे आहेत.

त्यांचा मुलगा गोपाळ यांच्यानुसार गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने कुमार रामसे यांचे निधन झाले. दुपारी साधारण 12-1च्या दरम्यान त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. भयपट निर्माते एफ यू रामसे यांचा मुलगा कुमार रामसे हे सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, 1947 मध्ये फाळणीनंतर एफयू रामसे यांचे कुटुंब मुंबईत आले होते. या बंधूंना त्यांच्या हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जाते. चित्रपट निर्माते आणि कुमार रामसे यांचे भाऊ श्याम रामसे यांचे 2019 मध्ये निधन झाले होते.

(हेही वाचा: Dilip Kumar: 'या' गंभीर आजाराने ग्रस्त होते अभिनेते दिलीप कुमार; मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला खुलासा)

रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. कुमार रामसे यांनी चित्रपटांसाठी स्क्रिप्ट लिहिण्यामध्ये मुख्य भूमिका बजावली. यामध्ये, ‘पुराना मंदिर’ (1984), ‘साया’ आणि ‘खोज’ (1989) यांचा समावेश आहे. सायामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि लोकप्रिय फिल्म 'खोज'मध्ये ऋषी कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यांनी ‘और कौन?’ तसेच 1981 मध्ये ‘दहशत’ची निर्मिती केली होती.