Rani Mukerji Birthday: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला अभिनय नव्हे, तर 'या' क्षेत्रात करायचं होत काम; वडिलांच्या चित्रपटातून केली करिअरची सुरूवात
Rani Mukerji Birthday (PC - File Image)

Rani Mukerji Birthday: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या कारकीर्दीत तिने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या असून उत्तम अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवलं आहे. लग्नानंतर राणी चित्रपटात फारचं क्वचित दिसली आहे. लाइमलाइटपासून दूर असलेली राणी मुखर्जी 21 मार्च रोजी आपला 43 वा वाढदिवस साजरी करीत आहे. या खास प्रसंगी तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी कोलकाता येथे झाला होता. राणी मुखर्जींने चित्रपटांमध्ये चांगले नाव कमावले असले तरी तिची पहिली पसंती अभिनय आणि चित्रपटात नव्हती. या अभिनेत्रीस प्रथम फॅशन डिझायनर बनण्याची इच्छा होती, परंतु कदाचित नशिबाने काहीतरी वेगळे मंजूर केलेलं होतं. राणी चित्रपटांत आली आणि तिने चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवलं. बर्‍याच लोकांना असं वाटतं की, राणी मुखर्जींचा पहिला चित्रपट 'राजा की आयेगी बारात' हा होता. पण ही राणी मुखर्जीची हिंदीतील डबिंग फिल्म होती. तिचा पहिला चित्रपट बीयर फूल हा होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राणीचे वडील राम मुखर्जी यांनी केले होते. तो एक बंगाली चित्रपट होता. चित्रपटात राणी प्रोसेनजित चटर्जीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. (वाचा - SpiceJet कडून Sonu Sood ने लॉकडाऊन दरम्यान केलेल्या कामाचा गौरव; Boeing 737 विमानावर झळकला अभिनेत्याचा फोटो)

यानंतर अभिनेत्री गुलाम, कुछ कुछ होता है, मन, हॅलो ब्रदर, हे राम, हद कर दी आपने, बिच्छू, हर दिल जो प्यार करेगा, कहीं प्यार ना हो जाए, चोरी चोरी चुपके चुपके, नायक आमि कभी खुशी कभी गम आदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. राणीला तिच्या करिअरमध्ये कधी संघर्ष करावा लागला नाही. कारण, तिने सर्वच चित्रपटात उत्तम कामगिरी केली. राणीच्या अभिनयाची सर्वत्र खूपचं चर्चा झाली. साथिया, चलते चलते, एलओसी कारगिल, युवा, हम तुम, वीर जारा, ब्लॅक, बंटी और बब्ली, बाबुल, लागा चुनरी में दाग आणि सांवरिया, नो वन किल्ड जेसिका, दिल बोले हड़ि‍प्पा, तलाश, आइया आणि बॉम्बे टाकीज सारख्या चित्रपटातही राणींने महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत.

राणी मुखर्जीने 2014 मध्ये यश चोप्राचा मुलगा आदित्य चोप्राशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. मर्दानी आणि हिचकीसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाला लोकांची पसंती मिळाली. आता अभिनेत्री बंटी आणि बबली चित्रपटाच्या दुसर्‍या भागासंदर्भात चर्चेत आहे.

राणी मुखर्जीने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत 17 वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं होतं. तिने 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय राणीने आयफा, झी सिने, स्टार गिल्ड, स्क्रीन अवॉर्ड यासहित अनेक पुरस्कार जिंकले आहेत.