SpiceJet कडून Sonu Sood ने लॉकडाऊन दरम्यान केलेल्या कामाचा गौरव; Boeing 737 विमानावर झळकला अभिनेत्याचा फोटो
सोनू सूद चा गौरव (Photo Credit : Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या वेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने लाखो कामगार आणि गरीब लोकांना बस, गाड्या व विमानातून विनामूल्य त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली होती. यासह त्याने इतर अनेक प्रकारे लोकांची मदत केली होती. आता स्पाइसजेट (SpiceJet) या कंपनीने सोनू सूदच्या प्रशंसनीय कार्याबद्दल हटके पद्धतीने त्याचा गौरव केला आहे. अभिनेत्याचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने बोईंग 737 वर सोनू सूदचा एक मोठा फोटो लावला आहे. या बरोबरच त्यांनी विमानावर एक संदेश लिहिला आहे- 'A Salute To The Savior Sonu Sood' म्हणजेच लोकांचा तारणहार सोनू सूदला सलाम.

याबाबत सोनूने म्हटले आहे की, ‘माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला आठवतंय जेव्हा मी प्रथम मुंबईला आलो होतो तेव्हा मी इथे आरक्षणाशिवाय आलो होतो. स्पाइस जेटने मला हा सन्मान दिला, मी खूप आभारी आहे आणि मला खूप अभिमान वाटत आहे. लोकांच्या प्रार्थनेमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो.’ कोरोना साथीच्या वेळी सोनी सूदने लाखो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्याच वेळी, उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान सारख्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मायदेशी परतण्यास मदत केली होती. (हेही वाचा: FIAF Award 2021: महानायक अमिताभ बच्चन ठरले 'एफआयएएफ पुरस्कार' मिळवणारे पहिले भारतीय; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद)

लॉकडाउननंतर स्पाइसजेटने सोनू सूदबरोबर काम केले होते, त्याअंतर्गत त्यांनी बाहेरील देशात अडकलेल्या सुमारे 1500 हून अधिक भारतीयांना परत आणले. स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले की, कोरोना साथीच्या वेळी सोनू सूद यांच्याबरोबर आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. हा खास फोटो स्पाइसजेटच्या वतीने सोनूच्या निःस्वार्थ प्रयत्नांसाठी एक पाऊल आहे. यासह राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी सोनू सूदला न्यायमूर्ती नरेंद्रसिंग स्मृती आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान केला.