कंगना रनौत (Photo Credit : Twitter)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने मणिकर्णिका या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आता ती आपल्या प्रोडक्शनद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. कंगनाने 'मणिकर्णिका' नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. याद्वारे ती आता पहिला चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे हा चित्रपट अयोध्या राम मंदिर प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचे शीर्षक 'अपराजित अयोध्या' (Aparajitha Ayodhya) असे देण्यात आले आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, कंगना रनौत तिच्या नव्या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षापासून सुरू करणार आहे.

चित्रपटाची स्क्रिप्ट केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. याबाबत बोलताना कंगना म्हणाली, 'राम मंदिराचा विषय गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. 80 च्या दशकात जन्म झाल्यावर मी अयोध्याचे नाव नकारात्मकरित्या ऐकतच मोठी झाली आहे. या प्रकरणाने भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलला. या निकालामुळे भारतातील शतकानुशतकांचा वाद थांबला आहे. एका व्यातीचा नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंतचा प्रवास 'अपराजित अयोध्या'मध्ये दिसणार आहे. म्हणूनच मला वाटले की माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी हा सर्वात योग्य विषय असेल.' (हेही वाचा: कंगना ठरली बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; जयललिता यांच्या बायोपिकसाठी घेतले तब्बल 24 कोटी)

दरम्यान, कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'थलाइवी' पुढील वर्षी 26 जूनपर्यंत रिलीज होत आहे. याशिवाय कंगना रनौत ‘पंगा’ मध्येही दिसणार असून, यात अभिनेत्री रिचा चड्ढादेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम मंदिर प्रकरणावर निकाल दिला. कोर्टाने एएसआय (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) चा हवाला देत म्हटले की, बाबरी मशीद कोणत्याही रिकाम्या जागेवर बांधलेली नाही. वादग्रस्त भूमीखाली एक रचना होती आणि ती इस्लामिक रचना अजिबात नव्हती, त्यामुळे या वादग्रस्त जागेवर रामलल्लाचाच हक्क असेल.