मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे आणि पीएम मोदींच्या बायोपिकनंतर आता जयललिता (Jayalalithaa) यांचा बायोपिक येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींच्या नावाचा विचार झाला होला, अखेर कंगना राणावत (Kangana Ranaut) च्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने सर्वाधिक मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. कंगना या चित्रपटासाठी तब्बल 24 कोटी रुपये घेणार आहे. आतापर्यंत दीपिकाने ‘पद्मावत’साठी सर्वाधिक म्हणजे 14 कोटी मानधन घेतल्याचे सांगितले गेले होते. याबाबतीत आता दीपिकाला मागे टाकून कंगना बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळमध्ये 'थलायवी' (Thalaivi) तर हिंदीमध्ये ‘जया’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विष्णु इंदुरी करणार आहेत. ‘मणिकर्णिका’ आणि ‘बाहुबली’सारख्या चित्रपटांचे लेखक के व्ही विजेंद्र प्रसाद यांनी या बायोपिकचे कथा लेखन केले आहे. (हेही वाचा: तब्बल 16 वर्षानंतर शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'इश्क विश्क'चित्रपटाचा सिक्वल येणार)
काही आठवड्यांपूर्वी कंगनाचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा बायोपिक प्रदर्शित झाला. यामधील कंगनाच्या भूमिकेचे अतिशय कौतुक झाले होते, त्यानंतरच तिचा भाव वधारला. जयललिता यांच्या बायोपिकबद्दल कंगना म्हणते, ‘जयललिता या शतकातील सर्वात यशस्वी महिला होत्या. त्या सुपरस्टार होत्या आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्याही होत्या. त्यांचा रोल साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. मला ही संधी मिळणे माझे भाग्य आहे’,