
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही वर्षांमध्ये तिने भाजप (BJP) पक्षाला उघडपणे पाठींबा दर्शवला आहे व त्यामुळे केलेल्या विविध वक्तव्यांमुळे तिला टीकेचा सामनाही करावा लागला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मोठे वक्तव्य केले आहे. कंगना रणौतला एका कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला की, तिला भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवायची आहे का?
त्याला उत्तर देताना ती म्हणाली की, जर जनतेची इच्छा असेल आणि पक्षाने तिला 2024 साठी तिकीट दिले, तर तिला मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक नक्कीच लढवायची आहे. अशाप्रकारे कंगनाने आपल्या राजकीय कारकिर्दीचे संकेत दिले आहेत. कंगना राणौतच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. या कार्यक्रमात कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. कंगना राणौत म्हणाली की तिचे वडील सकाळी जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी म्हणतात.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही काही वेळाने याच कार्यक्रमात पोहोचले. यादरम्यान अँकरने त्यांना प्रश्न विचारला की, कंगनाने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले, कंगना राणौत जीचे भाजपमध्ये स्वागत आहे आणि त्यांच्या तिकीटावर पक्ष स्पष्ट निर्णय घेईल. ते म्हणाले, कंगना राणौत पक्षात आल्यास त्यांची जबाबदारी पक्ष ठरवेल. निवडणूक लढवण्याबाबत बोलायचे तर, तो माझा एकट्याचा निर्णय नाही. पक्षात तळागाळापासून ते निवडणूक समिती आणि संसदीय मंडळापर्यंत प्रक्रिया होते, ते याबाबत निर्णय घेतील. (हेही वाचा: Bharti Singh: कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत मोठी वाढ! भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया विरोधात एनसीबीकडून 200 पानांचे आरोपपत्र दाखल)
लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येण्यास तयार असल्याचे कंगनाने या कार्यक्रमात सांगितले होते. ती म्हणाली की, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्पर्धा नाही. त्यांची तुलनाही करू नये. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना कंगना म्हणाली की, हिमाचलच्या लोकांना मोफत वीज नको आहे. येथील लोक स्वतःची वीज स्वतः बनवतात. राजकारणात येण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली, ‘सरकारला जर माझा सहभाग हवा असेल, तर मी सहभागी होईन. हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर खूप चांगले होईल. ती नक्कीच भाग्याची गोष्ट असेल.’