बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने (Kalki Kochelin) शुक्रवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाअगोदर गरोदर राहिल्याने कल्की नेहमी चर्चेचा विषय ठरली. कल्कीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकल्यानंतर कल्की आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. कल्कीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आई झाल्यानंतरच्या भावना व्यक्त करत आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. कल्कीने आपल्या मुलीचं नाव अगदी विचारपूर्वक ठेवल्याचं दिसून येत आहे.
कल्कीने तिच्या मुलीचं नाव 'साफो' (Sappho) असं ठेवलं आहे. हे नाव जाहीर केल्यानंतर कल्कीचे चाहते या नावामागचा अर्थ जाणून घेण्यास उत्सुक आहेत. 'साफो' हा ग्रीक शब्द असून हे एका कवयित्रीचे नाव आहे. साफो नावाची कवयित्री प्रचंड लोकप्रिय होती. त्यामुळे कल्कीने आपल्या बाळाचं नाव 'साफो' असं ठेवलं आहे. कल्की मागील दोन वर्षांपासून गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे. कल्कीच्या गरोदरपणात तिने अनेकदा आपल्या बेबी बंप सोबत स्टायलिश फोटो शूट केले होते. (हेही वाचा - Oscars 2020: ‘पैरासाइट’ठरला ऑस्कर विजेता सर्वोत्कृष्ट चित्रपट,वॉकिन फीनिक्स बेस्ट अॅक्टर)
कल्कीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये साफोविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. यात कल्कीने म्हणाली, 'कृपया साफोचं स्वागत करा. साफो 9 महिने माझ्या गर्भाशयात शांत झोपली होती. त्यामुळे आता तिला या नव्या जगात जागा देऊया. माझ्या मुलीला आशिर्वाद दिल्याबद्दल आणि तिचं स्वागत केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रसुती वेदनांना सामोऱ्या जाणाऱ्या प्रत्येक महिलांचा कायम आदर करा. त्यांचा हक्क आपण त्यांना दिला पाहिजे, असंही कल्कीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'साफो' नावमागील इतिहास -
'साफो' हा ग्रीक शब्द आहे. लेस्बोस नावाच्या बेटावर ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात 'साफो' नावाची कवयित्री राहात होती. या कवयित्रीने आपल्या कवितांच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. साफो यांनी आपल्या काव्यातून स्त्रियांच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित केलं होतं.