Ram Gopal Varma यांच्या अडचणीत वाढ; कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्याने सापडले नव्या वादात
Ram Gopal Varma (फोटो सौजन्य- फेसबुक)

Ram Gopal Varma: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) अनेकदा वादामुळे चर्चेत असतात. त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधानेही केली आहेत. परंतु, यावेळी कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याने ते वादात सापडले आहेत. राम गोपाल वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना सुमारे 1.25 कोटी रुपये दिले नाहीत. यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने राम गोपाल वर्मावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम गोपाल वर्मा यांच्यावर तंत्रज्ञ, कलाकार आणि कर्मचाऱ्यांचा पगार 1.25 कोटी रुपये न भरल्याचा आरोप आहे. महासंघाचे अध्यक्ष बीएन तिवारी आणि सरचिटणीस अशोक दुबे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राम गोपाल वर्मा यांना यासंदर्भात कायदेशीर नोटीसही पाठविली गेली होती. परंतु, दिग्दर्शकाकडून या नोटीसला प्रतिसाद मिळाला नाही. (Virat-Anushka च्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल; Watch Photo)

फेडरेशनच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2017 मध्ये राम गोपाल वर्मा यांना नोटीस पाठविली गेली होती. परंतु, तरीदेखील तंत्रज्ञांचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. या नोटीसनंतरही फेडरेशनने रामगोपाल वर्मा यांना अनेकदा सातत्याने नोटिसा पाठविल्या आणि त्यांना कर्मचार्‍यांचे पगार देण्यास सांगितलं गेलं.

लॉकडाऊनदरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी शुटींग चालू ठेवल्याचा आरोपही फेडरेशनने केला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, राम गोपाल वर्मा यांच्या गोव्यातील शूटिंगसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर फेडरेशनने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. (Sandalwood Drug Case: अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा Aditya Alva ला सँडलवुड ड्रग्ज प्रकरणात अटक; 5 महिने फरार होता )

बीएन तिवारी यांनी असेही म्हटले आहे की, तंत्रज्ञ, कलाकार आणि कामगार यांचे वेतन न मिळाल्याने त्यांनी यासंदर्भात इंडिया मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन आणि इंडिया प्रोड्यूसर गिल्ड यांना माहिती दिली आहे. तसेच आम्ही भविष्यात त्याच्याबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर संघटनांनाही या बंदीबद्दल सांगण्यात आलं आहे. जेणेकरून ते देखील भविष्यात त्यांच्याबरोबर काम करणार नाहीत. राम गोपाल वर्मा बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहेत. त्यांनी कंपनी, सत्या, रंगीला, सरकार, आणि 26/11 यासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.