बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा (Govinda) कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये आला होता, तेव्हापासून तो आणि त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. गोविंदा आणि त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेक यांच्यात बराच काळ हा वाद सुरू आहे. काका आणि पुतणे दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत किंवा समोरासमोर येत नाहीत. आता या विषयावर गोविंदा उघडपणे बोलला आहे. एका मुलाखतीत गोविंदाने कृष्णा एक चांगली व्यक्ती असल्याचे म्हटले आहे, तसेच तो जे काही ते करत आहे त्यामागे दुसरेच कोणीतरी असल्याचेही गोविंदाने सांगितले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना गोविंदा यांनी आपला मुद्दा मांडला. गोविंदा म्हणाले, 'मला हे माहित नाही कोण हे सर्व कृष्णाकडून करवून घेत आहे, मात्र तो एक चांगला मुलगा आहे. तो जे काही करत आहे त्यामुळे माझी प्रतिमाही खराब होत आहे. जो कोणी हे सर्व करवत आहे त्याला माझे आणि कृष्णाचे संबंध बिघडवायचे आहेत.’
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा 'सपना' ची भूमिका साकारत होता आणि शोमध्ये दोन वेळा गोविंदा आल्यावर कृष्णा दोन्ही भागात दिसून आला नव्हता. त्यानंतर गोविंदा आणि कृष्णामधील वाद इतका वाढला होता की गोविंदा म्हणाले होते की, आता त्यांना कृष्णाच्या कुटूंबापासून दूर राहायचे आहे. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ची शिवसेनेवर जोरदार टीका; ट्विट करत म्हणाली, योग्य पद्धतीने चौकशी केल्यास महाराष्ट्र सरकार कोसळेल)
कृष्णा यांनी आपल्या एका निवेदनामध्ये असे म्हटले होते की, जीवन आणि मृत्यूसाठी लढा देत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठीही गोविंदा रुग्णालयात आले नाहीत. दुसरीकडे, कृष्णाचे हे म्हणणे नाकारत गोविंदा म्हणाले होते की, कृष्णाला हे माहित नसेल मात्र मी आपल्या कुटुंबासमवेत त्याचा मुलाला भेटायला गेलो होतो. आपण डॉक्टर आणि परिचारिकाचीही भेट घेतली होती. तसेच त्यांनी कृष्णाची पत्नी काश्मिरा शहा यांना गोविंदाच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याला भेटण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.