फिल्ममेकर Vivek Agnihotri यांनी केली 'The Kashmir Files Unreported' ची घोषणा; ZEE5 वर होणार रिलीज, जाणून घ्या सविस्तर
Vivek Agnihotri (PC - ANI)

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) विविध कारणांनी चर्चेत असतात. याआधी त्यांचे नाव त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटामुळे बातम्यांमध्ये झळकले होते. एकीकडे विवेक अग्निहोत्री या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे त्यांनी नुकतीच एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) या नॉन-फिक्शन प्रोजेक्टची घोषणा केली, जो लवकरच 'ZEE5' वर रिलीज होईल.

याआधी विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट विविध कारणांनी गाजला होता. एकीकडे या चित्रपटाला  जोरदार विरोध झाला तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ने तगडी कमाई केली. आता एका वर्षानंतर चित्रपट निर्मात्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर, 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'ची अधिकृत घोषणा करत, काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराचे अश्‍लील सत्य समोर येईल, अशी माहिती दिली आहे.

या प्रोजेक्टबाबत केलेल्या पोस्टमध्ये अग्निहोत्री म्हणतात, 'अनेक नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी काश्मीर फाइल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे ज्यावर फक्त एक सैतानच प्रश्न करू शकतो. लवकरच येत आहे #KashmirUNREPORTED. रडायला तयार व्हा. फक्त ZEE5 वर' (हेही वाचा: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये अभिनेत्री Disha Vakani पुन्हा Dayaben च्या भूमिकेत कमबॅक करणार?)

दरम्यान, 'द काश्मीर फाईल्स'मध्ये दहशतवाद्यांकडून हिंदू समुदायाच्या लोकांच्या हत्येनंतर काश्मीरमधून काश्मिरी हिंदूंच्या पलायनाचे चित्रण करण्यात आले आहे. अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी अभिनीत हा चित्रपट 2022 मधील सर्वात यशस्वी हिंदी चित्रपटांपैकी एक होता. 'द व्हॅक्सिन वॉर' बद्दल सांगायचे तर, हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि आसामी अशा 11 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.