
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) ची पत्नी आलिया (Aliya Siddiqui) ने घटस्फोटासाठी अर्ज (Divorce Notice) दाखल केला आहे. विशेष म्हणजे आलियाने पोटगीची मागणी करत नवाजुद्दीन सिद्धीकीवर गंभीर आरोप केले आहेत. आलियाकडून नवाजला घटस्फोटासंदर्भात रितसर नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच आलियाने नवाजुद्दीनकडून पोटगीचीही मागणी केली आहे.
आलियाच्या वकिलांनी झी न्यूजला यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, आलियाकडून नवाजुद्दीनला 7 मे रोजी ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु, नवाजुद्दीनने या नोटीशीला कोणतेही उत्तर दिलेले नाही. लॉकडाऊनमुळे नवाजुद्दीन यांना स्पीड पोस्टद्वारे नोटीस पाठवता आली नाही. मात्र, ईमेल तसेच व्हॉट्सअॅपवरुन त्यांना घटस्फोटासंदर्भातील नोटीस पाठविण्यात आली आहे. आलिया यांनी नवाजुद्दीन यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत, असं आलिया यांच्या वकिलाने सांगितलं आहे. (हेही वाचा - कलाकारांनी केलेल्या कामाचे पैसे द्या, अन्यथा त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल - निया शर्मा)
दरम्यान, आलियाने 'झी न्यूज'शी संवाद साधताना सांगितलं की, आपल्या वैवाहिक आयुष्यात तणाव असून तो अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. पुढे अशाच परिस्थितीत हे नातं टीकवणं कठीण असल्याचंही आलियाने म्हटलं आहे. घटस्फोटामुळे नवाज आणि आलियाचं 10 वर्षांचं वैवाहित नातं धोक्यात आलं आहे. आतापर्यंत नवाजने या नोटीशीला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे नवाजुद्दीन या प्रकरणावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.