Sushant Singh Rajput Ashes Immersion: सुशांत सिंह राजपूतला अखेरचा निरोप; गंगेत विसर्जित केल्या अस्थी (See Photo)
Sushant Singh Rajput Ashes Immersed (Photo Credits: ANI, Twitter)

अखेर सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) शेवटचा निरोप देण्यात आला आहे. बिहारमध्ये जन्मलेल्या सुशांतच्या मुंबई येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कारानंतर, आता त्याच्या अस्थींचे गुरुवारी गंगेमध्ये विसर्जन (Ashes Immersion) करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतचे अत्यंत जवळचे लोक यावेळी उपस्थित होते. विलेपार्ले स्मशानभूमी घाटावरील अखेरच्या अंत्यसंस्कारानंतर सुशांतच्या अस्थी मुंबईतील  पटना येथे आणण्यात आल्या होत्या. आता आज या अस्थी राजधानीच्या दिघा गंगा घाटावर विसर्जित करण्यात आल्या. याच ठिकाणी सुशांतच्या आईच्या अस्थीही विसर्जित करण्यात आल्या होत्या.

यावेळी सुशांतचे वडील केके सिंह, त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती आणि कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते. पाटण्याच्या दिघा घाटावर गुरुवारी दुपारी साधारण 1 वाजता सुशांतच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर त्याचे कुटुंब पाटणा राजीवनगर येथील आपल्या घरी पोहोचले. सुशांतचे श्राध्दकार्य पटना येथेच होणार असून, यामध्ये पूर्णिया येथील वडिलोपार्जित गावातले लोक आणि नातेवाईक सहभागी होतील. सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी बुधवारी त्याच्या पटणाच्या घरी पूजा करण्यात आली होती. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या चौकशीच्या मागणीसाठी, जितेंद्र आव्हाड घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट)

सुशांतच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब पूर्णपणे तुटून गेले आहे. सुशांतची बहीण अमेरिकेत असल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकली नव्हती, आता श्वेता सुशांतच्या अस्थी विसर्जनासाठी पटना येथे आली आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्तीने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की- 'मी माझ्या घरी पटना येथे सुखरूप पोहोचले आहे. प्रार्थनेद्वारे आम्हाला मदत करणार्‍या प्रत्येकाचे आभार. आज आम्ही सुशांतच्या अस्थींचे विसर्जन करू. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगते. त्याचे जीवन साजरे करा, त्याच्या आठवणी, खूप खूप प्रेम आणि आनंदाने त्याला निरोप द्या.'