Amitabh-Abhishek Bachchan Bought Flats in Mumbai: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)यांनी मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. या पिता-पुत्राने एकाचवेळी एक-दोन नव्हे तर 10 सदनिका खरेदी केल्या आहेत. अमिताभ-अभिषेकने मुंबईतील मुलुंडमध्ये 10 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या सर्व 10 अपार्टमेंटची एकूण किंमत सुमारे 24.95 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या ताज्या कराराची माहिती स्क्वेअर यार्डच्या माध्यमातून मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांवरून प्राप्त झाली आहे.
मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, अमिताभ आणि अभिषेक यांनी ओबेरॉय रियल्टीच्या ओबेरॉय एटर्निया प्रकल्पात 10 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. ओबेरॉय एटर्निया प्रोजेक्टमध्ये रेडी-टू-मूव्ह 3 BHK आणि 4 BHK अपार्टमेंट उपलब्ध आहेत. कागदपत्रांनुसार, बच्चन कुटुंबाने खरेदी केलेले हे सर्व 10 फ्लॅट 10,216 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहेत. बच्चन कुटुंबाने 10 फ्लॅट्ससह 20 कार पार्किंग स्पेसही खरेदी केल्या आहेत. (हेही वाचा -Ramayana: 'रामायण'मध्ये जटायूची भूमिका साकारणार अमिताभ बच्चन, बिग बजेट चित्रपटाला देणार आपला आवाज)
कागदपत्रांनुसार 10 पैकी 8 सदनिकांचे चटईक्षेत्र 1049 चौरस फूट आहे तर उर्वरित 2 सदनिकांचे चटईक्षेत्र 912 चौरस फूट आहे. पिता-पुत्राने 10 फ्लॅटसाठी 1.50 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 3 लाख रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. या सर्व फ्लॅटची नोंदणी 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाली होती. (हेही वाचा - Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान)
स्क्वेअर यार्ड्सच्या रिपोर्टनुसार, या 10 फ्लॅटपैकी 6 फ्लॅट्स अभिषेक बच्चनने खरेदी केले आहेत, ज्यांची किंमत 14.77 कोटी रुपये आहे. तर वडील अमिताभ बच्चन यांनी 4 फ्लॅट खरेदी केले आहेत. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनी 2020 ते 2024 दरम्यान रिअल इस्टेटमध्ये एकूण 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.