प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्या वेगाने या चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत, ते पाहता हा चित्रपट अनेक विक्रम मोडू शकेल असे वाटते. रिलीजपूर्वीच अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवशी अनेक शो हाऊसफुल्ल चालले आहेत. त्याच वेळी, दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. आदिपुरुषची तिकिटे प्रीमियम थिएटरमध्ये 2,000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत.
अहवालानुसार दिल्ली आणि मुंबईमध्ये या चित्रपटाच्या तिकिटाचा सर्वात जास्त दर आहे. मुंबईत अनेक ठिकणी या चित्रपटाचे एक तिकीट 2,000 रुपयांना विकले जात आहे. कोलकाता आणि बंगळुरूमध्येही असेच चित्र दिसत आहे, परंतु चेन्नई आणि हैदराबाद आदिपुरुषची तिकिटे खूपच कमी किमतीत विकली जात आहेत. बुधवारी रात्रीपर्यंत 'आदिपुरुष'च्या 3.92 लाख तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले होते.
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट आहे. तब्बल 5 भाषांमध्ये 16 जून म्हणजेच उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रामायणावर आधारित हा चित्रपट थ्रीडीमध्येही जगभरात प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुषमध्ये प्रभासने राघवची, कृती सेननने जानकीची आणि सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका केली आहे, तर देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका केली आहे. या चित्रपटात सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत आहे. (हेही वाचा: Devendra Fadnavis wishes Team Adipurush: देवेंद्र फडणवीस यांनी खास फोटो शेअर करत आदिपुरुष टीमला दिल्या खास शुभेच्छा)
'आदिपुरुष' देशात 6200 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज होत आहे. यामध्ये तो 4000 हून अधिक स्क्रीन्सवर फक्त हिंदी व्हर्जनमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने विकेंडला तो बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करू शकतो, असेही सांगितले जात आहे.