मनी लाँड्रिंग ( Money Laundering Case) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandes) हिचा अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. 22 नोव्हेंबर रोजी जामीन अर्जावर सुनावणी करताना पटियाला हाऊस कोर्टाने हा निकाल दिला. यावेळीही जॅकलीन फर्नांडिस वकिलाच्या वेशात कोर्टात पोहोचली. ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात जॅकलीन सहआरोपी आहे. दरम्यान, न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सर्व पक्षांना आरोपपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे प्रदान करण्याचे निर्देश दिले. जामीन आणि इतर प्रलंबित अर्जांवर १० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यावर्षी 17 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी आहे. न्यायालयाने तिला समन्सही बजावले आहे. समन्स मिळाल्यावर जॅकलीनने वकीलामार्फत कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी घेतल्यावर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. ठग सुकेश चंद्रशेखर गेल्या एक वर्षापासून या प्रकरणामुळे चर्चेत आहे. (हेही वाचा, जॅकलिनच्या परदेशात जाण्यावर बंदी कायम, ईडीने दिल्ली कोर्टात ठेवली ही भक्कम बाजू)
तपास एजन्सीने 17 ऑगस्ट रोजी या प्रकरणात आरोपी म्हणून जऐकलीनचे नाव घेऊन आरोपपत्र दाखल केले. सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिनला 7 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने भेट दिल्याचा आरोप आहे. त्याने जॅकलीन आणि तिच्या कुटुंबीयांना अनेक उच्च-स्तरीय कार, महागड्या पिशव्या, कपडे, शूज आणि महागडी घड्याळे भेट दिली होती. सध्या तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांसारख्या विविध हाय-प्रोफाइल व्यक्तींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, याआधी सप्टेंबरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, जॅकलीनने चंद्रशेखरसोबत सहा महिन्यांपासून संबंध असल्याचे कबूल केले परंतु तिला त्याच्या हालचालींबद्दल माहिती नसल्याचा दावा केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयने सांगितले.