BMC च्या नोटीसविरोधात अभिनेता Sonu Sood ची उच्च न्यायालयात धाव; अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने बीएमसीच्या (BMC) नोटीशी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उपनगरी जुहू येथील निवासी इमारतीत परवानगी न घेता बेकायदा स्ट्रक्चरल बदल केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. गेल्या आठवड्यात अधिवक्ता डी.पी.सिंह यांच्यामार्फत सोनू सूदने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सांगितले होते की, सहा मजली शक्तीसागर इमारतीत आपण कोणतेही 'बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम' केले नाही. सोमवारी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांचे सदस्य पीठ या याचिकेवर सुनावणी करेल.

सिंह म्हणाले की, ‘याचिकाकर्ते सूद यांनी इमारतीत असे कोणतेही बदल केलेले नाहीत ज्यासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असेल. यामध्ये केवळ महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत समाविष्ट असतील असेच बदल केले गेले आहेत.’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पालिकेने बजावलेली नोटीस रद्द करावी आणि या प्रकरणात अभिनेत्यावर दंडात्मक कारवाई केल्यास अंतरिम दिलासा मिळावा अशी विनंती याचिकेत केली आहे. उल्लेखनीय आहे की गेल्या वर्षी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर सूद यांनी दिवाणी न्यायालयात धाव घेतली पण तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही.

महापालिकेने गेल्या आठवड्यात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत, परवानगी नसताना निवासी इमारतीत हॉटेलमध्ये रुपांतर केल्याबद्दल एफआयआरची मागणी केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोटीस दिल्यानंतरही सुद यांनी सूचनांचे पालन केले नाही आणि बेकायदा बांधकामे तशीच राहिली असल्याचे इमारतीची तपासणी केल्यानंतर आढळून आले होते. मात्र, पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविला नाही. आता उच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे लवकरच समजेल. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत याचा मित्र ऋषिकेश पवार याने पळ काढल्यानंतर NCB कडून शोध सुरु, अभिनेत्याला ड्रग्ज दिल्याचा ठपका)

दरम्यान, दबंग’, ‘जोधा-अकबर’ आणि ‘सिंबा’ सारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी सोनू सूद ओळखला जातो. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या मदतीमुळे सोनू सूद याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.