कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसर्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. देशभरातील लोक वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेबद्दल तक्रार करीत आहेत. रूग्णालयात बेड्स, ऑक्सिजन नाहीत. रेमेडसवीर इंजेक्शनचीही आबाळ आहे. अशा परिस्थितीत गरजू लोक आपल्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी मिळेल तिथून मदत घेत आहेत. सध्याच्या काळात मदतीसाठी सरकार आणि खासगी क्षेत्राबरोबरच इतर अनेक लोक पुढे येत आहेत व यामध्ये एक नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजे अभिनेता सोनू सूद (Sonu Sood).
सोनू सूद हा गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. लोक दिवस-रात्र त्याच्या सोशल मिडिया खात्यांवर मदत मागत आहेत. गेल्या वर्षी कोरोना व्हायरस लॉकडाऊनपासून सोनू सूद लोकांना मदत करीत आहे. त्याने मागच्यावर्षी स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. तसेच गरजूंच्या रोजगाराचीही व्यवस्था केली होती. सोनू सूद गेल्या वर्षापासून इतरही अनेक प्रकारे जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता सोनू सूदने माहिती दिली आहे की त्याच्याकडे एका दिवसात तब्बल 41,660 लोकांनी मदत मागितली आहे.
Yesterday I got close to 41660 requests
We try our best to reach out to all.
Which we can't..
If I try to reach out to everyone it will take me 14 years to do that.
That means it will be 2035 🇮🇳🙏
— sonu sood (@SonuSood) May 9, 2021
रविवारी सोनू सूदने एक ट्विट केले, ज्यात त्याने देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नसल्याबद्दल असहायता व्यक्त केली. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'काल, 41,660 लोकांनी मला मदतीसाठी विनंती केली. आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत, मात्र ते आमच्यासाठी शक्य नाही. मी यातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास मला त्यासाठी 14 वर्षे लागतील. याचा अर्थ असा की 2035 पर्यंत मी प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचू शकेन.' (हेही वाचा: कोरोना काळात Rohit Shetty ची मोठी मदत; कोविड सेंटरसाठी दान केले 250 बेड्स)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनू सूदने कोरोनामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे सरकार आवाहन केले होते. सोनू सूदने 25 एप्रिल रोजी एक टेलिग्राम अॅप लाँच केले आहे, ज्याद्वारे तो देशभरातील गरजू लोकांना रुग्णालयामध्ये बेड्स, औषधे आणि ऑक्सिजन प्रदान करेल. यापूर्वी अभिनेत्री नेहा धुपिया आणि क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या कुटुंबाला सोनू सूदनेही मदत केली आहे.