Abhijit Bichukale and Udayanraje Bhosale (Photo: Facebook)

बिग बॉस मराठी 2 मधील सर्वात गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale). एबी अशा टोपण नावाने ओळखले जाणारे बिचुकले यंदाही निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. तशी त्यांनी सोशल मीडियाद्वारे घोषणाही केली. पण यंदाच्या निवडणुकी संदर्भात ते एक मोठा गौप्यस्फोट लवकरच करणार असल्याचे त्यांनी लेटेस्टली मराठी सोबतच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितले.

"मी किंवा माझी पत्नी अलंकृता बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढवणार आहोत. पण त्याबद्दलचा अंतिम निर्णय उद्याच होईल," असा खुलासा त्यांनी केला. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे देखील साताऱ्यातून निवडणूक लढवणार असल्याने अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसमुळे मिळालेली पॉप्युलॅरीटी ही उदयनराजेंना डोकेदुखी ठरू शकते.

उदयनराजेंविषयी ते म्हणाले, "शिवेंद्र राजेंचा पराजय झाल्याशिवाय मी अंगावर गुलाल लावून घेणार नाही असं म्हणणारे उदयनराजे आज त्याच शिवेंद्र राजेंसोबतच निवडणुकीचा फॉर्म भरायला जातात. असल्या गोष्टी मी कधी केल्या नाहीत. तसेच मी गेले 20 वर्ष निवडणुका लढवतोय, आणि त्यांच्यासारखी पक्ष बदलण्याची गरज मला कधी पडली नाही."

राजकारणापलीकडे उदयनराजेंविषयी सांगताना बिचुकले म्हणाले, " बिग बॉस मधून आल्यावर माझी उदयनराजेंशी भेट झाली. त्यांनी माझं कौतुक केलं, मी ही त्यांना माझा अनुभव सांगितला."

अभिजीत बिचूकलेंनी या आधीही अनेकदा निवडणुका लढवल्या. पण पाहिजे तसं यश त्यांना मिळालं नाही. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "निर्णय शेवटी जनतेच्या हातात आहे. त्यात मी काही करू शकत नाही. बिग बॉसने पॉप्युलॅरीटी दिली खरी पण त्यामुळे लोक भेटायला येतील, जेवायला बोलवतील, मत देणार नाहीत. मतांसाठी माणूस कसा आहे तेच जनता बघते."

राजकारणासोबतच त्यांना सिनेसृष्टीतून पण अनेक ऑफर असल्याचे त्यांनी सांगितले. "मला बिग बॉस संपल्यावर 5 सिनेमांसाठी ऑफर आल्या. तसेच हिंदी बिग बॉससाठी पण ऑफर आली. पण निवडणूक हेच माझं मुख्य ध्येय असल्याने मी इतर कसलाही विचार केला नाही. भविष्यात मी एखाद्या सिनेमाची ऑफर स्वीकारेनही पण सकारात्मक भूमिका असलेलाच," असं बिचुकले यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.