Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात एकटे पडले अभिजित बिचुकले; पत्नीने सदस्यांवर केले हे आरोप
अभिजित आणि अलंकृता बिचुकले (संग्रहित-संपादित प्रतिमा)

मराठी बिग बॉसचा दुसरा सिझन (Bigg Boss Marathi 2) सुरु झाला आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच. दुसऱ्याच दिवशी सदस्यांचे एकमेकांबद्दलचे विचार आणि पहिल्या नॉमिनेशन टास्क दरम्यान त्यांचे स्वभाव दिसून आले. यामध्ये सर्वात जास्त टारगेट होत आहेत अभिजित बिचुकले. एकूणच बिचुकले यांचे वागण, बोलणे, सवयींमुळे घरातील जवळजवळ सर्वच सदस्य त्रासले आहेत. त्यात बिचुकले हे स्ट्रॉंग प्लेयर नसल्याचे लक्षात आल्याने घरातील मुलींनी जणू पदोपदी त्यांचा अपमान करण्याचा चंगच बांधला आहे. हे सर्व बिचुकले यांचे कुटुंब पाहत आहे, यावर हे सर्व मुद्दाम केले जात असल्याचे बिचुकले यांच्या पत्नी, अलंकृता बिचुकले यांचे म्हणणे आहे.

टाईम्स ऑफ इंडिया ऑनलाईनशी बोलताना, बिचुकले यांच्या पत्नीने सध्या घरात चाललेल्या गोष्टींबद्दल आपले मत मांडले, त्या म्हणाल्या, ‘मी रोज हा शो पाहते, माझ्या पतीला मुद्दाम लक्ष्य करत एकटे पाडण्याचा डाव घरातील सदस्यांचा आहे. घरातील इतर सदस्य आणि बिचुकले यांची पार्श्वभूमीवर वेगळी आहे, त्यामुळे माझ्या पतीचा दृष्टीकोन लोकांच्या लक्षात येत नाहीये. माझे पती हुशार आहेत, त्यांना घरातील सदस्यांनी ओळखलेच नाही,’

दरम्यान, कालच्या भागात बिचुकले यांच्या वागण्याने रुपालीला पारा प्रचंड चढला होता. अतिशय त्रागा करत तिने बिचुकले यांना समजावतान अपमानास्पद वागणूक दिली. दुसऱ्या दिवशी परत बिचुकले यांच्या एका वाक्यामुळे शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नेहा, शिवानी आणि रुपाली उघडपणे बिचुकले यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बिग बॉसच्या घरात साताऱ्याच्या या राजकारण्याचा प्रवास किती दिवसांचा ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.