Bigg Boss 14 ची टॅलेंट मॅनेजर Pista Dhakad चा अपघातामध्ये मृत्यू; सलमान खानने सोशल मिडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
Salman Khan Morns Pista Dhakad's Death (Photo Credits: Instagram)

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या सेटमधून काल एक वाईट बातमी समोर आली होती.  'बिग बॉस 14' ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड (Pista Dhakad) हिचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी होती. शोच्या सेटच्या बाहेरच पिस्ता धाकडचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी तिला खूप गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. पिस्ताच्या मृत्यूनंतर अनेकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. आता शोचा होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही (Salman Khan) पिस्ताला सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

सलमानने ‘Rest in peace Pista...’ असे ट्वीट करत स्वतःचा पिस्तासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. 23 वर्षीय पिस्ता धाकडच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण टीव्ही जगात शोककळा पसरली आहे. अनेक टीव्ही स्टार्सना या बातमीने खूप धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. पिस्ता धाकड ही 'बिग बॉस 14' या शोची निर्मिती करणाऱ्या एंडेमोल शाइन इंडिया या प्रोडक्शन कंपनीत काम करत होती. (हेही वाचा" बिग बॉस 14 ची टॅलेंट मॅनेजर Pista Dhakad हिचा मृत्यू; Weekend Ka Vaar शूटनंतर सेटबाहेरच अपघात)

असे सांगण्यात येत आहे की शुक्रवारी, 15 जानेवारी रोजी वीकेंड का वारच्या शूटिंगनंतर पिस्ता स्कूटी घेऊन घरी जाण्यासाठी निघाली. पण रात्रीच्या अंधारात तिची स्कूटी घसरुन खड्ड्यात पडली. त्यानंतर ती मागून येणार्‍या व्हॅनिटी व्हॅनच्या खाली आली आणि तिचा मृत्यू झाला. बिग बॉस व्यतिरिक्त पिस्ता धाकडने खतरों के खिलाडी सारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. बिग बॉस 14 बद्दल बोलायचे झाले तर, या कार्यक्रमाचा सिझन हळू हळू आपल्या अंताच्या दिशेने वाटचाल करत आहे. शोने 100 पेक्षा जास्त दिवस पूर्ण केले आहेत.