चला हवा येऊ द्या (photo credit : Wikimedia Commons)

'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील कार्यक्रमातील सर्वच पात्रे अतिशय लोकप्रिय झाली आहेत. प्रत्येक भागात जी नवीन पात्रे सादर केली जातात त्यांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेले पाहायला मिळते. नुकतेच 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात एक आगरी पात्र दाखवण्यात आले होते. मात्र हे पात्र आणि त्याच्या तोंडचे संवाद यांमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याबाबत चला हवा येऊ द्या च्या टीमने माफी मागावी अशी मागणी अॅड. भारद्वाज चौधरी यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर घटनेचे महत्व लक्षात घेता भाऊ कदम यांनी तातडीने आगरी समाजाची जाहीर माफी मागितली आहे.

'चला हवा येऊ द्या ' च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट'मध्ये विविध कवी, गायक अशी पात्रे दाखवण्यात आली होती. यातील एका पात्रावर टिप्पणी करत, आगरी समाजाच्या भरभरून दागिने घालण्यावरून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये केलेला विनोद हा अयोग्य असून अंगभर दागिने घालणे ही आगरी समाजाची परंपराच असल्याचं अॅड. भारद्वाज चौधरी म्हणाले होते. तसेच भरभरून दागिने केवळ आगरीच नव्हे, इतर समाजाचे लोकही घालतात, मग केवळ आगरी समाजालाच त्यासाठी लक्ष्य का केलंय, असा सवाल त्यांनी कार्यक्रमाच्या टीमला पत्र पाठवून विचारला होता. जर कार्यक्रमाच्या टीमने माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पत्रातून देण्यात आला होता.

या पत्राची तातडीने दाखल घेत आता भाऊ कदम यांनी आगरी आणि कोळी समाजाची माफी मागितली आहे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात जे आगरी, कोळी पात्र दाखवले, ते आमच्याकडून चुकून झाले. ते पात्र आक्षेपार्ह असून आम्ही तो भाग सगळीकडून डिलीट केला आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही आगरी, कोळी बांधवांची जाहीर माफी मागतो. यापुढे आमच्याकडून कोणत्याही समजाचा अपमान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.’ अशा शब्दांमध्ये भाऊ कदम यांनी माफी मागितली आहे.