लवकरच येणार 'कॉफी विथ करण'चे 6वे पर्व; ही बहिण-भावाची जोडी असेल पहिले गेस्ट
कॉफी विथ करण

छोट्या पडद्यावर सध्या मालीकांसोबत ‘टॉक शों’चीही बरीच चलती आहे. म्हणूनच मोठ्या पडद्यांवरील अनेक कलाकार टॉक शोच्या माध्यमातून छोटा पडदा काबीज करताना दिसतात. सिम्मी गरेवाल, रविना टंडन, अनुपम खेर, नेहा धुपिया यांच्या टॉक शोमध्ये आपण अनेक सेलिब्रिटी गेस्ट्सना पहिले आहे. मात्र प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्यास हे शो कमी पडले असावेत त्यामुळे काळानुसार या शोंची लोकप्रियतादेखील कमी झाली. मात्र या सर्वांमध्ये असा एकच शो आहे ज्याची लोकप्रियता गेली 14 वर्षे टिकून आहे. बॉलिवूडमधील जवळ जवळ प्रत्येक सेलिब्रिटीने या शोमध्ये हजेरी लावली आहे. या शोमुळे अनेक वादंग माजले; कंगना राणावतने याच शोमध्ये करण जोहरवर केलेले आरोप जगजाहीर आहेत, काही नाती दुरावली तर काही लोक मित्र बनले. तर हा शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. लवकरच हा शो त्याचे 6वे पर्व घेऊन लोकांच्या भेटीस येत आहे.

19 नोव्हेंबर 2004 साली या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. आणि अजूनही ह्या शोची यशस्वी घोडदौड चालूच आहे. आतापर्यंत या शोने 5 पर्वांचा पल्ला गाठला असून, 21 ऑक्टोबर 2018 रोजी या शोच्या 6 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 6व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडचे पाहुणे असणार आहेत इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित भाऊ-बहिण अर्जुन आणि जान्हवी कपूर. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा शोच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.

अर्जुन आणि श्रीदेवी यांच्या नात्याबद्दल नेहमीच तर्कवितर्क लावले जात होते, मात्र श्रीदेवी यांच्या मृत्यू नंतर अर्जुन आणि त्याची सावत्र बहिण जान्हवी यांचे नाते नव्याने सुरु झालेले दिसते. या एपिसोडमध्ये त्यांच्या नात्यांमधील अनेक गुपिते ते शेअर करणार आहेत.

या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या लिस्टमध्ये काही नवीन लग्न झालेली जोडपी; विराट-अनुष्का, सोनम-आनंद तसेच स्टारकिड्स सुहाना खान, अहान पांडे, अनन्या पांडे यांच्याही नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.  करण जोहरच्या हटके संभाषण स्टाईल आणि प्रश्न विचारण्याचा पद्धतीमुळे हा शो अतिशय कमी कालावधीमध्ये फारच गाजला. आत्तापर्यंत या शोचे 113 एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत.