Ola Electric Scooters: ओला लवकरच भारतात लॉन्च करणार इलेक्ट्रीक स्कूटर; आता कमी किंमतीत मिळणार शानदार मायलेज
Ola Electric Scooters (Photo Credit: Twitter)

कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओला (Ola) पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) लॉन्च करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ओलाने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी इटेरगो बी.व्हीचे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे. याशिवाय कंपनी भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठीही प्रयत्नशील आहे. यासाठी ओला देशातील अनेक राज्य सरकारसोबत चर्चा करत आहेत. ही स्कूटर भारतात लॉन्च झाल्यानंतर अनेकांना याचा फायदा मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

ओला सध्या कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर भर देत आहे. माहितीनुसार, इटेरगो बी. व्ही एकदा चार्ज झाल्यानंतर 240 किलोमीटरपर्यंतचे अतंर कापता येणार आहे. त्यामुळे इतर देशाप्रमाणे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न आहे. भारतात सध्या 2 कोटी स्कूटर आहेत. पेट्रोलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटरला भविष्यातील गाडी मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, भारतात पहिली स्कूटर लाँच केल्यानंतर एका वर्षात 10 लाख इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हे देखील वाचा- KTM ची नवी बाईक प्रति महिना 5500 रुपये देऊन घरी आणता येणार, ऑफरचा लाभ घेण्यासाठी अशी करा बुकिंग

2014 मध्ये नेदरलँडमधील इलेक्ट्रिक कंपनी इटेरगोची स्थापना झाली होती. अॅपस्कूटरसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. इनोव्हेटिव्ह डिझाईन आणि इंजिनिअरिंगसाठी या स्कूटरने जगभरातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. यात सीईएस 2019 चे काही पुरस्कार आणि जर्मनीचे ऑटोमोटिव्ह ब्रॅन्ड कॉन्टेस्ट पुरस्कार यांचा समावेश आहे.