नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने Volkswagen ला ठोठावला 100 कोटींचा दंड
फॉक्सवॅगन (Photo by Steffi Loos/Getty Images)

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (national green tribunal) जर्मन कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगनला (volkswagen) 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतात डिझेल गाड्यांमधील कार्बन उत्सर्जनाच्या आकडेवारीत अफारातफर केल्याचा फॉक्सवॅगनवर आरोप आहे.

एनजीटीचे अध्यक्ष आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली फॉक्सवॅगनच्या गाड्यांपासून होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीत पर्यावरण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, सीपीसीबी आणि ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशनच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फॉक्सवॅगन कंपनीमुळे पर्यावरणाचे किती नुकसान झाले हे तपासण्याचे आदेश याच समितीला देण्यात आले होते. यामध्ये फॉक्सवॅगन कंपनी दोषी असल्याचे आढळून आले.

सप्टेंबर 2015 मध्ये कंपनीचा हा घोटाळा उघडकीस आला होता. 2008 ते 2015 या काळात कंपनीने तब्बल 1.11 कोटी गाड्या विकल्या. या गाड्यांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी दाखवण्यासाठी अफरातफर करण्यात आली होती. त्यामुळे चाचणीदरम्यान कार्बन उत्सर्जन कमी असल्याचे निर्दशनास आले. मात्र गाड्यांमधून नायट्रस ऑक्साईड हा वायू उत्सर्जित होत होता.