भारतीय वाहन उद्योग (Auto Sector) सध्या गंभीर संकटाच्या काळातून जात आहे. दिवसेंदिवस वाहनांच्या विक्रीमध्ये विक्रमी घट होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर वाहन उद्योगाला येत्या काही दिवसांत मोठे टाळे लागण्याची शक्यता आहे. यामुळेच या उद्योगातील एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीने सरकारकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय वाहन निर्माता कंपनी महिंद्र अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) यांनी बुधवारी वाहन क्षेत्राबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
कंपनीच्यामते, घरगुती वाहन क्षेत्रातील हजोरो नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने वाहन उद्योगांना कर कपात व इतर मार्गांनी तातडीने मदत केली पाहिजे. बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याची समस्या वाहन निर्मात्यांसमोर निर्माण झाली आहे. सुमारे 55 ते 60 टक्के निधी बँकांकडून व्यावसायिक वाहन उत्पादकांना देण्यात येतो, तर प्रवासी कार तयार करण्यासाठी 30 टक्के निधी मिळतो. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा, तसेच मारुती सुझुकी, टाटा मोटर्स या कंपन्यांकडे वाहनांचे उत्पादन कमी करण्याचा किंवा चालू असलेले प्रकल्प तात्पुरते बंद करण्याचा असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. (हेही वाचा: खुशखबर! इलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त; GST मध्ये मोठी कपात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने म्हटले आहे की, वस्तूंच्या किंमती घसरल्यामुळे सध्या केवळ मार्जिन राखण्यास कंपन्या सक्षम आहेत. मात्र यामध्ये कंपनीला कोणताही फायदा होत नाही. अशा परिस्थितीत सरकारने वस्तू व सेवा कर (GST) दर कमी करून वाहनांची विक्री वाढविण्यावर भर दिला पाहिजे. वाहनांची विक्री कमी झाल्यामुळे वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या 35 दशलक्ष कर्मचार्यांच्या नोकरीवर संकट ओढवले आहे. रॉयटर्स (Reuters) ने मंगळवारी एक अहवाल प्रसिद्ध केला, त्यानुसार एप्रिलपासून ऑटोमेकर, पार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि डीलर्स क्षेत्रातील जवळपास 3.50 लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढे पार्ट्स मेकर, सप्लायर, डीलर आणि असंघटित क्षेत्रातील लोकांच्याही नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.