एकीकडे गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत, तर दूसरीकड पेट्रोल डीझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. या सर्वात प्रदूषण होत आहे ते वेगळेच. म्हणून आता सरकार इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicle) प्रोत्साहन देत आहे. आता इलेक्ट्रिक वाहण्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीवरील जीएसटी (GST) 12 टक्क्यावरून चक्क 5 टक्के करण्यात आला आहे. सोबत ईव्ही चार्जेस 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली, नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जीएसटी कौन्सिलची 36 वी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये या महत्वाच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अमंलबजावणी होणार आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या, इलेक्ट्रिक बसवरील भाडेदेखील जीएसटीतून मुक्त करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये भर पडेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. (हेही वाचा: Car purchase: पेट्रोल पंप घेणार निरोप; वाहन खरेदी करताना घ्या काळजी; इलेक्ट्रिक कार काळाची गरज)
ज्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवतात त्यांनीदेखील जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, इलेक्ट्रीक वाहनांसाठी सरकारने पूर्णतः टोलमाफी केली आहे. तसेच अशा गाड्यांना कोणतेही पार्किंग शुल्कही भरावे लागणार नाही. इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन भारतात ई-कारचा वापर वाढावा यासाठी सरकार विविध योजना सुरु करत आहे. अशा वाहनांसाठी नव्या नंबर प्लेट्सदेखील देण्यात आल्या आहेत. या वाहनांची नंबरप्लेट हिरव्या रंगात असणार आहेत, यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे.