Nitin Gadkari (Photo Credits: ANI)

सध्या देशात इलेक्ट्रिक कारची (Electric Vehicles) बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे, त्यामुळे वाहन उत्पादक सातत्याने नवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे देखील इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. मात्र गाड्यांच्या महागड्या किमतीमुळे मनात असूनही अनेक लोकांना ते विकत घेता येत नाही. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनची किंमत पेट्रोल कारच्या बरोबरीची असावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, येत्या वर्षभरात देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल कारप्रमाणे असतील. म्हणजेच पेट्रोल कार आणि इलेक्ट्रिक कारच्या किंमती सामान असतील. इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल कारच्या तुलनेत खूप जास्त आहे. परंतु आता गडकरींच्या या घोषणेनंतर ईव्ही विकत घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, संपूर्ण देशात इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची सरकारची मोठी योजना आहे, त्यावरही वेगाने काम सुरू आहे.

गडकरींच्या मते, भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत 800 टक्के वाढ झाली आहे. 2022 मध्ये भारतात सुमारे 17 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली. भारतात 1.5 लाख बस आहेत, त्यापैकी 93% डिझेलवर चालतात आणि अनेक जुन्या आणि सदोष आहेत. शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी या सर्व बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. गडकरी म्हणाले की, नजीकच्या काळात भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या मोटारींची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा: 'मी देखील तुमची कार विकत घेऊ शकत नाही'; नितीन गडकरींनी मर्सिडीज बेंझला दिला उत्पादन वाढवण्याचा सल्ला)

आपल्या भाषणात गडकरी म्हणाले की, भारतात येणारा काळ हा इलेक्ट्रिक मोबिलिटीचा आहे. दरम्यान, गडकरींच्या मते, भारतातील पर्यटन वाढवण्यासाठी सरकार डबल डेकर बसेसची संख्या वाढवण्याचा मानस आहे. ऑटो अवॉर्ड्स 2022 मध्ये बोलताना, गडकरी म्हणाले की, सरकार एसी डबल-डेकर बसेसच्या तिकिटांची किंमत कमी करून सर्वसामान्यांसाठी अधिक परवडणारी बनवण्याची योजना आखत आहे.