आता BMW खरेदीचे स्वप्न सत्यात उतरणार; सीरिज-3 गाड्यांवर तब्बल 8 लाखांची सूट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit :Top Gear)

पेट्रोलच्या किंमती वाढल्या तरी भारतीयांचे वाहन प्रेम काही कमी होणार नाही. ट्राफिक वाढले, रस्त्यावरील गर्दी वाढली तरी स्वतःच्याच वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देणारी मंडळी काही कमी नाहीत. शौक म्हणूनदेखील अनेक लोक विविध प्रकारच्या गाड्यांचा संचय करतात. दसरा-दिवाळी यांसारखे उत्सव म्हणजे वाहन खरेदीचा हंगामच होय. आजही दारासमोर उभी असलेली गाडी हे प्रतिष्ठिततेचे लक्षण मानले जाते. त्यातही जर का गाडी बीएमडब्ल्यू (BMW) असेल तर विचारायलाच नको ! प्रत्येकाच्या स्वप्नातली ही गाडी प्रत्यक्षात प्राप्त होणे फारच अवघड आहे, त्यामुळे लोक फक्त BMWला पाहूनच नजरसुखाचा अनुभव घेतात. मात्र आता हे स्वप्न सत्यात उतरू शकते, कारण BMWच्या गाड्यांवर तब्बल 8 लाखांची सूट मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही BMW कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एकदम योग्य वेळ आहे.

सणासुदीचा काळ लक्षात घेऊन जर्मनीची दिग्गज कारनिर्माती कंपनी BMWने आपल्या सीरिज-3 गाड्यांवर बंपर डिस्काऊंंट जाहीर केला आहे. कंपनीकडून आपल्या स्पोर्टी सिडान कारच्या प्रेस्टीज व्हेरिअंटवर 7.30 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. तर लग्जरी व्हेरिअंटवर 8.30 लाख रुपयांचा डिस्काऊंंट मिळणार आहे.

काय असेल किंमत –

BMWच्या प्रेस्टीज व्हेरिअंटची किंमत 39.80 लाख रुपये आहे. मात्र आता डिस्काऊंंटनंतर ही गाडी तुम्ही 32 लाखामध्ये खरेदी करू शकाल. तर लग्जरी व्हेरिअंटची मूळ किंमत 45.30 लाख रुपये आहे, आणि आता ही गाडी तुम्हाला 37 लाखामध्ये मिळणार आहे. या किंमती एक्स शोरूमच्या किंमती आहेत.

डिस्काऊंंटमागे कदाचित हे कारण असू शकते –

BMW कंपनीने नुकतेच नेक्स्ट-जनरेशन 3 Series गाड्या पॅरिस मोटार शो-2018मध्ये सादर केल्या  होत्या. आता या गाड्या लवकरच मार्केटमध्ये येणाची शक्यता आहे. त्यामुळे एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, नवीन गाड्या बाजारात आणण्यापूर्वी जुन्या गाड्यांची जास्तीत जास्त विक्री करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे, त्यामुळेच या गाड्यांवर कंपनीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

मर्सिडीज-बेंझने गेल्या महिन्यातच भारतात 2018 सी-क्लास फेसलिफ्ट लॉंच केली आहे. या गाडीला मिळणारी लोकप्रियता बघता मर्सिडीजला टक्कर देण्यासाठी BMW कंपनीने नेक्स्ट-जनरेशन 3 Series गाड्या बाजारात आणल्याचे सांगितले जात आहे.