Israel-Hamas War: तुम्ही प्राण्यांसारखे वागलात त्यामुळे तुम्हाला तसाच मृत्यू मिळेल; इस्रायलच्या मंत्र्याने हमासला दिला कडक इशारा
Israel-Palestine War | (PC - ANI/X)

Israel-Hamas War: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्धाचा आज 14 वा दिवस असून इस्रायलचे सैन्य गाझावर वेगाने हल्ले करत आहे. हमासचा खात्मा केल्यानंतरच आपण सहमती दर्शवू, असे इस्रायलने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दरम्यान, इस्रायलच्या एका मंत्र्याने मोठे वक्तव्य केले आहे. इस्रायलचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री एवी डिक्टर म्हणाले की, हमासने 'प्राण्यांसारखे' वागले होते आणि आता इस्रायल हमासला 'मानव प्राण्यांप्रमाणे' मारेल. ते म्हणाले की, हमास सारख्या संघटनेच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही समर्थनाची गरज नाही. हमासने इतर लोकांना जनावरांसारखे मारले आहे.

एएनआयशी बोलताना इस्रायली मंत्री डिक्टर यांनी दावा केला की, गाझाच्या अल अहली बॅप्टिस्ट हॉस्पिटलवरील क्षेपणास्त्र हल्ल्याला हमास आणि त्यांचे सहयोगी जबाबदार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या दिवशी तेल अवीवमध्ये उतरणार होते त्याच दिवशी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. हमासने प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचा फटका रुग्णालयाला बसल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Gaza Hospital Blast: अल-अहली हॉस्पिटलमध्ये स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू (Watch Videos))

इस्रायलच्या संरक्षण दलाने उत्तर इस्रायलमध्ये डागलेल्या रॉकेट आणि क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबनॉनमधील अनेक लक्ष्यांवर रात्रभर हल्ले केले. आयडीएफने म्हटले आहे की, ड्रोन हल्ल्यात लेबनॉनमध्ये एक संशयित दहशतवादी मारला गेला आहे.