आळशीपणा (Photo Credit : Pixabay)

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वात अधिक उत्साही आणि सर्वात जास्त आळशी देशांची वर्गवारी सादर केली आहे. यासाठी त्यांनी जगातील १६८ देशांमध्ये पाहणी केली आहे. या क्रमवारीत सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू देश म्हणून 'युगांडा' या देशाने पहिले स्थान पटकावले आहे. तर सगळ्यात आळशी देशांच्या यादीत 'कुवेत' हा देश अग्रस्थानी आहे. युंगाडामधील केवळ ५.५% जनता अधिक कार्यशील नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

उत्साही आणि शारीरिक कष्ट करणारा देश म्हणून अमेरिका १४३ व्या स्थानावर असून इंग्लंड १२३ व्या तर आशिया खंडातील सिंगापूर १२६ व्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाने ९७ वे स्थान मिळवले आहे. कुवेत, अमेरिका, सौदी अरेबिया व इराकमधल्या अर्ध्यापेक्षा जास्त जनतेची पुरेसी शारीरिक कसरत होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलं आहे.

भारताचा क्रमांक कितवा ?

उत्साही देशांच्या यादीत आपला भारत देश ११७ व्या स्थानावर तर फिलिपाइन्स १४१ आणि ब्राझिल १६४ व्या स्थानावर आहे.

आठवड्याला इतक्या मिनिटांचा व्यायाम आवश्यक

प्रत्येक आठवड्याला ७५ मिनिटांचा तीव्र किंवा १५० मिनिटांचा मध्यम स्वरुपाचा व्यायाम घडत असेल तरी तो आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

पुरुष अधिक मेहनती ?

बहुतेक देशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कमी उत्साही आणि शारीरिक कष्ट घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर गरीब देशांमध्ये अधिक उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत शारीरिक मेहनत घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळते.

...म्हणून शारीरिक व्यायाम कमी !

बैठे काम आणि वाहनांचा अति वापर यामुळे श्रीमंत देशांमधील नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याची नोंद झाली आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला दिसून येत नाही.

या सर्व बाबींचा विचार करता बहुतेक सर्वच देशातील लोकांनी पुरेसा व्यायाम करावा आणि शारीरिक कष्टाचं प्रमाण वाढवावं, यासाठी जागरुकता निर्माण करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.