अनेक राष्ट्रे सुरक्षेच्या कारणास्तव विविध देशांमध्ये आपले हेर नेमतात. कोणालाही संशय न येऊ देता हे हेर बिनचूक माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतात. आता यासाठी रशियाने (Russia) चक्क व्हेल (Whale) माशांच्या उपयोग आपले हेर म्हणून केला असल्याचा तज्ञांनी दावा केला आहे. नॉर्वेच्या आर्क्टिक महासागरात पांढऱ्या रंगाचे व्हेल मासे आढळले आहेत, ज्यांच्या गळ्यात हार्नेस (Harness) होते. हे हार्नेस रशियन बनावटीचे असून, त्याच्यावर ‘इक्युपमेंट ऑफ सेंट पीटसबर्ग’ असे लिहिलेले होते. यावरून हे मासे रशियाचे हेर असावेत असा अंदाज नॉर्वेच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
फिनमार्कच्या समुद्रात मागच्या आठवडयात सर्वप्रथम हा व्हेल मासा दिसला होता. त्यावेळी लोकल मच्छिमारांनी हे हार्नेस काढण्याचा प्रयत्न केला होता. व्हिएतनाम आणि इराक युद्धाच्यावेळी अमेरिका आणि रशियाने व्हेल, डॉलफिन, सी लायन्स, सील्स यांसारख्या समुद्री जीवांना हेरगिरीसाठी प्रशिक्षित केले होते. त्याचप्रमाणे आताही रशियाच्या नौदलाने या माशांना प्रशिक्षित करून, त्यांच्या गळ्यात कॅमेरा बांधून तो नॉर्वेमध्ये सोडला असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
मात्र रशियाने या गोष्टीला दुजोरा दिला नाही. अशाप्रकारे समुद्री जीवांना ट्रेनिंग देण्याचा कोणताही कार्यक्रम देशात चालू नसल्याचे रशियाने सांगितले आहे. दरम्यान, अमेरिका अशाप्रकारे समुद्री जीवांना ट्रेनिंग देत असल्याची बातमी जगजाहीर आहे. शत्रूने समुद्रात ठेवलेले सुरुंग शोधण्याचे काम हे समुद्री जीव करतात.