Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. द सन या ब्रिटीश वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. युक्रेनने स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनचा वापर करून पुतिन यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचे युक्रेनचे समकक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर सुमारे तासभर चर्चा केली.

फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर जिनपिंग यांनी झेलेन्स्की यांच्याशी बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिनपिंग यांनी झेलेन्स्की यांना शांततेचा प्रस्तावही दिला. द सनच्या म्हणण्यानुसार या आठवड्याच्या सुरुवातीला मॉस्कोपासून काही मैलांवर युक्रेनियन ड्रोनचे अवशेष सापडले होते. असे म्हटले जात आहे की एकतर या ड्रोनने आपल्या मर्यादेबाहेर उड्डाण केले किंवा ते रशियाची राजधानी मॉस्कोला प्रदक्षिणा घालत होते.

नोगिंस्क जंगलात UJ-22 ड्रोन सापडले. हे जंगल मॉस्कोपासून जवळ आहे. रशियन पोलिसांनी सांगितले की, ड्रोनमध्ये कॅनेडियन एम112 स्फोटके होते आणि त्याचे प्रमाण 17 किलोपेक्षा जास्त होते. हे ड्रोन व्लादिमीर पुतिन यांना मारण्याच्या मोहिमेवर होते, असा दावा केला जात आहे. पुतिन हे ड्रोन सापडल्यापासून थोड्याच अंतरावर एका नवीन औद्योगिक उद्यानाला भेट देत होते.

पुतिन यांच्या हत्येच्या प्रयत्नांचा दावा युक्रेनचा कार्यकर्ता युरी रोमनेन्को यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'आमच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना पुतिन यांच्या रुडनेवो येथील औद्योगिक उद्यानाच्या भेटीची माहिती मिळाली होती.' त्यांच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्याबद्दल मिळालेल्या माहितीने गुप्तचरांनी युक्रेनला कामिकाझे ड्रोन लॉन्च करण्यास प्रेरित केले. यानंतर हे ड्रोन रशियाच्या हवाई हद्दीत कोसळले. ड्रोन हल्ल्याची बातमी येताच पुतिन यांनी आपले वेळापत्रक बदलले. (हेही वाचा: Russia Ukraine War: 2 महिन्यांत रशियाने युक्रेनमध्ये हवाई हल्ले सुरू केल्याने 4 मुलांसह 25 जण ठार)

तेव्हापासून पुतिन त्यांच्या कार्यालयातच जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. रशियाच्या TASS वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, पुतिन ड्रोन उत्पादकांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट देतील तसेच ड्रोनच्या विकासाबाबत बैठकही घेणार आहेत. विशेष म्हणजे क्रॅश झालेले ड्रोन एका 35 वर्षीय स्थानिक महिलेने शोधून काढले. पाळीव मांजराचे पिल्लू पुरण्यासाठी ही महिला जंगलात गेली होती तिथे हे ड्रोन सापडले.