Vistara Mumbai-Frankfurt Flight UK27 Bomb Threat: 6 सप्टेंबर रोजी विस्तारा एअरलाईंन्सच्या बोईंग 787 मध्ये एका टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर विमानात बॉम्ब आहे असा मॅसेज लिहिला होता. यानंतर 'सुरक्षेच्या कारणास्तव' विमान फ्रँकफर्टला न नेता तुर्कस्तानमधील एरझुरम विमानतळाकडे वळवण्यात आले. त्यानंतर आता विस्तारा एअरलाईंन्सकडून या घटनेसंदर्भातील पुढची माहिती देण्यात आली आहे. विस्तारा विमान कंपनीकडून पर्यायी विमान तुर्कीमधील एरझुरम विमानतळावर पाठवण्यात आले आहे. दुपारी 12.25 (स्थानिक वेळ) पर्यंत विमान तेथे पोहोचेल. त्यानंतर फ्रँकफर्ट ला 14.30 वाजता (स्थानिक वेळ) सर्व प्रवाशांसह विमान रवाना होईल, असे विस्ताराकडून X ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे.
मुंबईहून-फ्रँकफर्टला जाणारे UK 27 हे फ्लाइट शुक्रवारी एक तासाच्या विलंबानंतर मुंबईहून दुपारी 1.01 वाजता निघाले होते. फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे संध्याकाळी 5.30 वाजता पोहोचणार होते. मात्र, विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी एअरलाइनच्या क्रूला सापडल्यानंतर ते तुर्कीकडे वळवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार,त्यावेळी विमानात 247 प्रवासी आणि कर्मचारी होते. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या वेळेची मर्यादा ओलांडली असल्याने, आम्ही एक पर्यायी विमान, क्रूच्या ताज्या संचासह, तुर्कीच्या एरझुरम विमानतळावर पाठवत आहोत, जे तेथे 12 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल त्यानंतर ते फ्रँकफर्टला रवाना होईल. असे विस्ताराने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे.
त्यात म्हटले आहे की, सर्व आवश्यक तपासण्या केल्या गेल्या आहेत. कर्मचारी आणि विमानासह प्रवाशांची सुरक्षा क्लिअर करण्यात आली आहे. यादरम्यान, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यांना अल्पोपाहार आणि जेवण देण्यात आल्याचे विस्ताराने निवेदनात म्हटले आहे.
शुक्रवारी एअरलाइनने सांगितले होते की त्यांची फ्लाइट UK27 मुंबई ते फ्रँकफर्ट, 'सुरक्षेच्या कारणास्तव तुर्की (एरझुरम विमानतळ) कडे वळवण्यात आली होती. विमानातील प्रवासी आणि क्रू यांची संख्या उघड करण्यात आली नाही.'