प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits- Twitter)

'सेल्फ हेल्प' गुरु म्हणवणाऱ्या किथ रॅनीयर (Keith Raniere) या 60 वर्षीय व्यक्तीला अमेरिकेच्या एका न्यायालयाने 120 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. महिलांना 'सेक्स गुलाम' (Sex Slaves) बनवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा आरोप किथवर करण्यात आला आहे. किथच्या फॉलोअर्समध्ये अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता. किथने आपल्या संघाचे नाव Nxivm असे ठेवले होते. मंगळवारी न्यूयॉर्कच्या कोर्टाने किथला सर्व आरोपांबाबत दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. म्हणजेच आता तो यापुढे तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाही.

माहितीनुसार, किथ त्याच्या पाच दिवसांच्या सत्रासाठी फॉलोअर्सकडून 5000 डॉलर घेत असे. अनेक महिलांनी आरोप केला की, किथने केवळ पैशांचीच फसवणूक केली नाही तर, लैंगिक शोषणही केले. त्याची संस्था पिरॅमिड स्ट्रक्चर अंतर्गत कार्यरत होती, ज्यामध्ये महिलांना स्वतःला 'सेक्स स्लेव्ह' आणि किथला 'ग्रँड मास्टर' असा दर्जा देण्यात आला होता. या महिलांनी किथबरोबर लैंगिक संबंध ठेवणे सक्तीचे होते.

अनेक महिलांनी कीथवर लैंगिक साधनेदरम्यान फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे व नंतर त्याच्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला होता. किथच्या आश्रमात अनेक स्त्रियांना प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली गेली होती. या महिलांना कोणासोबातही सेक्स ठेवण्यासाठी भाग पाडले जात असे. कीथच्या विरोधात फसवणूक, लैंगिक तस्करी, खंडणी, गुन्हेगारी कट रचणे आणि 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत.

एकूण 15 लोकांनी किथविरूद्ध साक्ष दिली, त्यातील 13 महिला आहेत. किथच्या या Nxivm पंथावर HBO ने एक मालिका देखील जारी केली आहे, ज्यामध्ये किथने अत्याचार केलेल्या लोकांनी त्यांची कहाणी मांडली आहे. मंगळवारी निकाल देण्यापूर्वी किथने सर्व पीडितांची माफी मागितली. आपण या सर्व लोकांचा राग आणि त्यांच्या वेदना समजू शकतो असेही किथने सांगितले. त्याने केवळ आपला गुन्हाच कबूल केला नाही तर, स्वतःला शिक्षा व्हावी यासाठी न्यायाधीशांकडे प्रार्थनाही केली. किथसह अन्य 5 साथीदारांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.