TATA Steel | (Photo credit: Tata Steel)

इंग्लंड मधील टाटा स्टीलवर्क्स प्लाट पोर्ट टॅलबोट (Tata Steel plant in Port Talbot) येथे तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटात दोघे जण जखमी झाले आहेत. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या स्फोटाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. ही घटना नेमकी कशी आणि कोणत्या कारणामुळे घडली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी तपास आणि बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

इंग्लंडमधील विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटानंतर परिसर हादरुन गेला. दरम्यान, साउथ वेल्स पोलिसांनी म्हटले आहे की, टाटा स्टीलवर्क्स प्लांटमध्ये घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाली आहे. तत्काळ आणि आवश्यक सेवा देण्यासाठी आदेश देण्यात आले असून, पोलीस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. इतर माहिती आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवू. आपल्या सहकार्याबद्धल धन्यवाद.

एएनआय ट्विट

साऊथ वेल्स पोलिसांनी म्हटले आहे की, या स्फोटामध्ये दोन लोकांना हलकीशी दुखापत झाली आहे.पोलिसांनी सांगितले की, सकाळी 3 वाजून 55 मिनिटांनी त्यांना दुरध्वनीवरुन माहिती मिळाली की, टाटा स्टीलवर्क्स प्लांटमध्ये आग लागली आहे. आमच्या माहितीनुसार या स्फोटात दोघांना दुखापत झाली. आम्ही लोकांना सांगितले आहे की, घटना घडलेल्या ठिकाणापासून दूर जा. उपलब्ध आणि आवश्यक ती सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.

एएनआय ट्विट

स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, टाटा स्टील प्लांडमध्ये 4,000 पेक्षाही अधिक लोक काम करतात. स्थानिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारा असा हा महत्त्वाचा आणि मोठा प्लांट आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाचा आवाज आला तेव्हा आम्हाला असे वाटले की, आमच्याजवळून एखादे विमानच निघाले आहे. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, नागरिकांच्या घरांच्या दारे आणि खिडक्यांच्या तावदानाला तडे गेले. (हेही वाचा, श्रीलंकेत आज पुन्हा एकदा बॉम्ब स्फोट, पुगोडा शहर आवाजाने हादरले)

टाटा स्टील युरोप ट्विट

दरम्यान, स्टील वर्क्स ने ट्विट करुन माहिती दिली आहे की, स्फोट झाला आहे मात्र, यात कोणताही कर्मचारी गंभीर जखमी झाला नाही. सोबत स्टील वर्क्सने असेही म्हटले आहे की, स्फोटानंतर लागलेल्या आगीवर आम्ही नियंत्रण मिळवले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.