Typhoon Hagibis (Photo Credits: Twitter)

जपानमध्ये (Japan) 60 वर्षातील सर्वात भयंकर वादळ 'हगिबीस'ने (Typhoon Hagibis) कहर केला आहे. शनिवारी सायंकाळी जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 180 किमी/तासाच्या वेगाने वाहणाऱ्या या वादळाने बर्‍याच घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे आतापर्यंत 14 लोकांचा बळी गेला आहे, तर 16 लोक अजूनही बेपत्ता आहे. या वादळात 110 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वेळीच प्रसंगावधान राखून प्रशासनाने सुमारे 42 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

फिलिपाइन्सने या वादळाला 'हगिबीस' हे नाव दिले आहे. तिथल्या स्थानिक भाषेत याचा अर्थ 'वेग' असा आहे. चक्रीवादळ हगिबीसमुळे केंटो आणि शिझुओका भागातील 2 लाख 12 हजार घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान खात्याने इबाराकी, तोचिगी, नीगाता, फुकुशिमा आणि मियागी येथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. टोमियोका शहरात मुसळधार पावसात भूस्खलनामुळे दोन घरे खाली पडली आहेत, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

पाण्याची पातळी वाढल्यामुळे जपानमधील सर्वात मोठे धरण शिरोआमामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. सागामी नदी व त्याच्या आसपासच्या भागात पूर येऊ शकतो असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. फुकुशिमा, तोचिगी, गुन्मा, साइतामा, चीबा, टोक्यो, कानागावा, यामानाशी, नगानो, शिजुओका आणि माई येथील सुमारे 8 लाख 13 हजार लोकांना त्वरित बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 1958 मध्येही जपानमध्ये असेच चक्रीवादळाने धडक दिली होती. त्यावेळी झालेल्या विनाशामध्ये सुमारे 1200 लोक मरण पावले होते. (हेही वाचा: दुर्मिळ मासे दिसल्याने घाबरून जपानमध्ये हाय अलर्ट; पुन्हा एकदा सुनामी आणि भूकंपाची शक्यता)

या वादळामुळे जपानमधील सर्व हवाई सेवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जपानी कंपन्यांनी 1929 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. रेल्वेचे नेटवर्कही बंद झाले आहे. टोकियो मधील सर्व थिएटर, शॉपिंग मॉल्स आणि कारखाने बंद करण्यात आले आहेत. जपानमधील रग्बी विश्वचषकातील सर्व सामने रद्द करण्यात आले असून, खेळाडूंना माघारी पाठविण्यात आले आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यांसह सरकारने आपत्कालीन सेवांचा भर दिला असून, लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.