'Covid-19 च्या अत्यंत धोकादायक टप्प्यावर आहे जग, जवळपास 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक'; WHO ने व्यक्त केली चिंता
WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus. (Photo Credits: Getty Images)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव जगभर सुरू आहे. आता तर कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे लोकांमध्ये (Delta Variant) चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus म्हणाले आहेत की, जवळजवळ 100 देशांमध्ये अधिक संसर्गजन्य ओळखला गेलेला डेल्टा प्रकार पोहोचला आहे. यामुळेच सध्या जग हे कोरोना कोरोना विषाणूच्या धोकादायक टप्प्यावर आहे. पत्रकार परिषदेत Tedros म्हणाले की, सर्वप्रथम भारतामध्ये आढळलेला  डेल्टा व्हेरियंट अजूनही बदल आणि म्युटेशन करीत आहे. सध्या अनेक देशांमध्ये तो कोविड-19 चा सर्वात धोकादायक प्रकार बनला आहे.

डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी सुचवले की लसीकरणाद्वारे साथीचा तीव्र टप्पा दूर केला जाऊ शकतो. ते म्हणाले की, पुढच्या वर्षी या वेळेपर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकांना लस दिली जावी याची खबरदारी घेण्यासाठी मी जगातील नेत्यांना विनंती केली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख पुढे म्हणाले, काही देशांनी योग्य पावले उचलून हे सुनिश्चित करावे की सर्व देशांमध्ये लसींचे वितरण होईल. त्यांनी सांगितले की आतापर्यंत तीन अब्ज लस डोस शेअर केले आहेत.

लसीकरणातील असमानता ही जगभरातील प्रमुख चिंता म्हणून उदयास आली आहे. जर याची काळजी घेतली नाही तर ही एक मोठी समस्या बनू शकते. आतापर्यंत जगभरात उत्पादित केल्या गेलेल्या कोविड लसीपैकी केवळ दोन टक्केच लसी गरीब देशांमध्ये वितरीत झाल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडासारख्या समृद्ध देशांनी एक अब्ज लस देण्याची घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की काही देश लसीकरणात मागे राहिले तर ते संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरेल. (हेही वाचा: Covid-19 Vaccine Update: युरोपीयन संघाच्या 'या' 7 देशांत Covishield लसीला मान्यता; प्रवासाचा मार्ग मोकळा)

महासंचालक म्हणाले की, सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशाच्या 10 टक्के लोकसंख्येला लस देण्यात यावी. या वर्षाच्या अखेरीस 40 टक्के आणि पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत 70 टक्के लोकांना लस द्यावी, असे झाले तरच कोरोनाचा पराभव होऊ शकतो. टेड्रोस म्हणाले की, आतापर्यंत ओळखल्या गेलेल्या कोरोनाच्या सर्व प्रकारांपैकी डेल्टा हा सर्वात संसर्गजन्य आहे आणि ज्यांना कोविड-विरोधी लस मिळाली नाही अशा लोकांमध्ये तो वेगाने पसरत आहे.