कोरोना विषाणू वुहान लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचला; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रसार कसा झाला? तो मानवापर्यंत कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी गेल्या एका वर्षापासून अभ्यास चालू आहे. हे जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) टीमने अलीकडेचं चीनमधील वुहान शहराला (Wuhan City) भेट दिली. वास्तविक वुहानमध्ये प्रथमच कोरोना संसर्गाची नोंद झाली होती. वुहानमधील लॅबमधून कोरोना विषाणू पसरविण्याचा चीनवर आरोप करण्यात आला होता. तथापि, चीनने नेहमीचं याचा विरोध केला आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अभ्यासात असा दावा केला जात आहे की, कोरोना वुहान लॅबपासून पसरलेला नाही, तर तो एका प्राण्यापासून मनुष्यापर्यंत पोहोचला आहे.

कोरोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी चीनला भेट दिलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू वटवाधूळीपासून इतर प्राण्यांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला गेल्याची शक्यता आहे. लॅबमधून व्हायरस पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. वृत्तसंस्था एपीला सापडलेल्या तपास पथकाच्या ही माहिती देण्यात आली आहे. (वाचा - Covid-19 Vaccine in Capsule: कोरोना लस नव्हे, तर आता कॅप्सूलनेही करता येणार कोविड-19 चे निर्मूलन)

मीडिया रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकाने लॅबमधून व्हायरस गळती करण्यासंदर्भातील पैलू सोडून इतर सर्व बाबींवर पुढील तपासणीचा प्रस्ताव ठेवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात सांगितले की, कोरोनाच्या उत्पत्तीविषयीचा अहवाल येत्या काही दिवसांत जाहीर होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. असं सांगितले जात आहे की, या अहवालात चार तत्त्वे आणि एका संभाव्य निष्कर्षाचा समावेश आहे.

दरम्यान, हा अहवाल प्रसिद्ध होण्यास सतत विलंब होत होता. ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वुहान शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर चीनवर जागतिक स्थरातून विविध आरोप करण्यात येत होते. मात्र, आता लवकरचं जागतिक आरोग्य संघटना यासंदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे.