उत्तर कोरिया (North Korea) हा जगातील एक रहस्यमय देश आहे. या देशातील माहिती सहसा बाहेर येत नाही. इथल्या अधिकाऱ्यांना जेव्हा वाटेल आणि देशात जेव्हा काही वेगळी घटना घडेल तेव्हाच इथल्या कायद्यांबाबत माहिती मिळत असते. 2020 नंतर हुकुमशाह किम जोंग-उन (Kim Jong-Un) याने देशातील कायदे अजून कडक केले आहेत. आता या नव्या कायद्यांनुसार एका व्यक्तीला शिक्षा म्हणून त्याच्यावर 500 लोकांच्या समोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. दक्षिण कोरियन चित्रपट आणि संगीताच्या सीडी बेकायदेशीर विक्री करणे हा या व्यक्तीचा गुन्हा होता. अशा प्रकारे पुन्हा एकदा किम जोंग-उनची क्रूरता समोर आली आहे.
या व्यक्तीचे नाव ली असे होते. तो वॉनसन फार्मिंग मॅनेजमेंट कमीशन येथे चीफ इंजीनियर म्हणून काम करत होता. अहवालानुसार, या व्यक्तीला छुप्या पद्धतीने दक्षिण कोरियन चित्रपट, संगीत आणि ब्रॉडकास्ट असलेली स्टोरेज साधने विक्री करताना पकडले. लीने मारण्यापूर्वी त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. तो म्हणाला की, 5 ते 12 डॉलर किंमतीत सीडी आणि यूएसबी स्टिकची विक्री करीत असे. लीला एप्रिल 2021 च्या उत्तरार्धात गोळीबार करणार्या पथकाने गोळ्या घालून ठार मारले. यावेळी लीच्या कुटुंबासह 500 लोक तिथे उपस्थित होते.
मागील वर्षी लागू झालेल्या नव्या कायद्यानुसार, ‘समाजविरोधी घटक’ गुन्ह्यांतर्गत ली दोषी आढळला होता. लीवर गोळ्या घालताना त्याच्या कुटुंबाला जबरदस्तीने ते कृत्य पाहायला लावले. हे दृश्य पाहून लीची बायको, मुलगा आणि मुलगी जागीच बेशुद्ध पडले. नंतर राज्याच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ट्रकमध्ये घालून राजकीय कैदीच्या छावणीत नेले. यावेळी या कुटुंबाच्या शेजाऱ्यांना रडण्यासही मनाई होती. (हेही वाचा: बाबो! Kim Jong-un यांचा नवा आदेश; उत्तर कोरियामध्ये Mullet Haircut, Ripped आणि Skinny Jeans, नाक व ओठ टोचण्यावर बंदी)
दरम्यान, डिसेंबर 2020 नंतर उत्तर कोरियामध्ये नियम बदलण्यात आले आहेत. येथे कडकपणा अजून वाढविला गेला आहे. आता येथे दक्षिण कोरियाचे चित्रपट, टीव्ही कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे. जर कोणी असे करताना पकडले गेले तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.