ऑफिसमध्ये काम करत असताना एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, यामुळे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमधील वर्क-लाइफ बॅलन्सबाबत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. आताचे हे प्रकरण थायलंडमधील (Thailand) समुत प्राकान प्रांतातील एका इलेक्ट्रॉनिक्स प्लांटशी संबंधित आहे. या ठिकाणी काम करत असताना एका 30 वर्षीय महिलेचा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला. मे नावाच्या या महिलेने आधी आतड्याला जळजळ झाल्याचे निदान झाल्यानंतर रजा घेतली होती. ती 5 ते 9 सप्टेंबर या कालावधीत वैद्यकीय प्रमाणपत्रासह आजारी रजेवर होती.
या काळात तिच्यावर 4 दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिची तब्येत अजून बिघडल्याने तिने 10 आणि 11 सप्टेंबर रोजी 2 दिवसांची रजा घेतली. परंतु याकाळात तिला पुरेशी विश्रांती मिळाली नाही, म्हणून तिने 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा आपल्या व्यवस्थापकाकडे रजेची विनंती केली.
महिलेने 13 सप्टेंबर रोजीची एका दिवसाची सुट्टी मागितली होती. त्यावर व्यवस्थापकाने तिला सांगितले की, ती खूप दिवसांपासून रजेवर आहे, त्यामुळे तिला आणखी रजा मिळू शकत नाही. तसेच त्याने तिला कार्यालयात येऊन नवीन वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. मॅनेजरने असे उत्तर दिल्यानंतर, महिला नोकरी गमावण्याच्या भीतीने गंभीर अवस्थेत कार्यालयात पोहोचली. मात्र तिच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ती फक्त 20 मिनिटे काम केल्यानंतर बेशुद्ध पडली. (हेही वाचा: Lucknow Shocker: लखनऊमध्ये खुर्चीवरून पडून HDFC बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; 'कामाच्या जास्त दबावाचा' आरोप)
बँकॉक पोस्टनुसार, बेशुद्ध पडल्यानंतर तीच्य मित्रांनी घाईघाईने तिला रुग्णालयात नेले. जिथे नेक्रोटायझिंग एन्टरोकोलायटिसच्या बाबतीत डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मेच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, तिने यापूर्वी कोणतीही निरर्थक रजा घेतल्याची नोंद नाही. मात्र आता तिला गरज असूनही कार्यालयाने तिला सुटी दिली नाही. या घटनेनंतर कंपनी डेल्टा इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या कर्मचाऱ्याच्या दुर्दशेबद्दल तीव्र खेद व्यक्त करणारी एक लांब फेसबुक पोस्ट लिहिली आहे. कंपनीने लिहिले आहे की, या घटनेची चौकशी केली जाईल.